शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (12:56 IST)

नारायण राणेंना अटक होणार? शिवसेना-भाजप संघर्ष पेटला

मुख्यमंत्र्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाबाबत राणे यांनी केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. राणेंच्या वक्तव्यावरून राज्यात ठिकठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत.
 
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे विरुद्ध शिवसेना हा वाद उफाळून येण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक जिल्ह्यात आणि वॉर्डात राणेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची तयारी शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी केली आहे, अशी माहिती समजत आहे.
 
महाड, नाशिक नंतर पुण्यात नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राणे सध्या चिपळूणमध्ये आहेत. तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व शांतता बाधित होईल असे चिथावणी देणारे वक्तव्य दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
 
नारायण राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी युवा सेनेचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांसमो आले आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
 
शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. दगडफेक सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक सुरू केली असा आरोप युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी केला.
 
आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. पोलिसांनी सेनेच्या कार्यकर्त्यांना अडवून धरलंय तर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोसायटीच्या आत ढकललं आहे.
 
पुण्यातही आंदोलन
पुण्यात गुडलक चौकात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील डेक्कन भागातील आर डेक्कन या नारायण राणे यांच्या मालकीचा मॉल आहे त्या मॉलच्या प्रवेश द्वारा जवळील एक काच शिवसैनिकांनी फोडली.
 
चिपळूणमध्ये सेना-भाजप आमनेसामने
चिपळूणमध्ये शिवसेनेचे भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची माहिती समोर येते आहे.
 
अमरावतीत भाजप कार्यालयावर हल्ला
अमरावती भाजप विभागीय मुख्य कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न, कार्यालयाबाहेरील भाजपचे बॅनर पेटवण्यात आले.
 
'...तर आमचंही सरकार केंद्रात आहे'
 
"माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझी बदनामी करायला घेतली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होईल, आमचंही केंद्रात सरकार आहे. राज्य सरकारची उडी किती लांब जाते ते पाहूया," असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
 
देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव माहिती नाही हा देशाचा अपमान आहे. हा देशद्रोह आहे. मी माध्यमांशी बोलायला बांधील नाही.
"मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. त्यांनी समोर उभं राहावं. नोटीस आणि पत्रात यात फरक आहे. ते राष्ट्रपती आणि पंतप्रधान आहेत का आदेश काढायला? कमिशनरांनी वक्तव्य तपासून पाहावं. मी तुमच्या सांगण्यावर विश्वास ठेवणार नाही. दोन दगड मारून गेले हा पुरुषार्थ नाही. ते जे काय करत आहेत ते करू दे. तक्रारदार सुधाकर बडगुजरला मी ओळखत नाही."नाशिक पोलीस आयुक्त यांनी नारायण राणे यांना अटक करावी असे आदेश काढले. नारायण राणेंविरोधात कलम 500, 502, 505, 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे.
 
कायद्यानुसार अटकेची प्रक्रिया सुरू आहे- पोलीस आयुक्त
कायद्यानुसार अटकेची प्रक्रिया सुरू आहे. गुन्ह्याचं गांभीर्य बघून, पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अटक करण्याचे आदेश आहेत. असं नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.
 
नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणाले, " ते दोषी आहेत की नाही हे त्यांनी न्यायालयासमोर मांडावं. रुल ऑफ लॉ नुसार कार्यवाही. केंद्रीय मंत्री राज्यसभेचे सदस्य आहेत. नाशिक पोलिसांचं पथक राणेंना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत."
 
सोमवारी (23 ऑगस्ट) राणे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. शिवसेना नेते, कार्यकर्त्यांनी यांनी हे वक्तव्य गांभीर्याने घेत कारवाई करण्याची मागणी केली.
 
अशा वक्तव्याप्रकरणी कारवाई करता येते का याबाबत कायदेशीर चाचपणी केल्यानंतर शिवसेना नेत्याने सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
 
नारायण राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून, असं वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे हे त्यांनी विसरु नये, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
 
राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण... - चंद्रकांत पाटील
नारायण राणेंच्या विधानावर तुम्ही प्रशासनिक समज देऊ शकता, पण थेट अटकेची कारवाई करणं ही राजकीय सूडबुद्धी आहे, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मी नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करत नाही, पण त्यांची एक शैली आहे. त्याच्यावर तुम्ही कारवाई काय करता हे महत्त्वाचं आहे, असंही पाटील यांनी म्हटलं.
 
प्रोटोकॉलचा विचार करता केंद्रीय कॅबिनेट मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या आधी येतात. त्यांना अशी अटक करता येत नाही. तुमची काही कैफियत असेल तर ती केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
 
महाविकास आघाडी सरकारकडून सरकारचा दुरूपयोग होत असल्याचाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
 
मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- राऊत
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पैसे देण्यापेक्षा प्रहारमधल्या कर्मचाऱ्यांना पगार द्या असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. "नारायण राणेंचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे. राणेंना मंत्रिपदी राहण्याचा कोणताही अधिकार नाही. असा मंत्री समाजाची काय सेवा करणार. राणेंचं वक्तव्य हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच अपमान आहे. त्यामुळे राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी", असं राऊत यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
 
दरम्यान युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहू येथील घराबाहेर जमण्याचे आदेश दिल्याचं समजतं. मुंबई पोलिसांनी त्यांना थांबवावं अन्यथा काही घडलं तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. सिंहाच्या गुहेत शिरण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही वाट बघत आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
राणे यांच्या वक्तव्यानंतर त्यांना विरोध करणारी पोस्टर्स दादर भागात लावण्यात आली होती. त्यावर नारायण राणेंचा फोटो होता. पोलिसांनी पोस्टर्स हटवली आहेत.