मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तुळजाभवानी मंदिराला अनोखे रूप

तुळजापूर- शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक विद्यतरोषणाईमुळे तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार राजे शहाजी महाद्वार उजळून निघाले आहे. देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी मातेचा मंदिर परिसर आकर्षक विद्यतरोषणाईने उजळून निघाला आहे. भाविकांनी देवाचरणी अर्पण केलेल्या या अत्याधुनिक विद्युतरोषणाईमुळे मंदिर परिसराला अनोखे रूप मिळाले आहे.
 
नवरात्रीत दररोज लाखो भाविकांच्या उपस्थितीत महोत्सव होणार आहे. श्री तुळजाभवानी मातेचे पुणे येथील निस्सीमभक्त विजय उंडाळे यांनी ‍मंदिरावर ही आकर्षक विद्युतरोषणाई केली आहे. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आकर्षक विद्युतरोषणाई भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. डोळ्यांचे पारणे फिटतील अशा अनेक चित्रफीती या अत्याधुनिक एलईडी रोषणाईच्या माध्यमातून साकारण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजे शहाजी महाद्वारासमोर आलेले भाविक थक्क होऊन जातात.
 
आठ दिवस न सुकणार्‍या देशी आणि विदेशी प्रजातीच्या मनमोहक फुलांची मंदिरातील गाभार्‍यासह परिसरात उंडाळे कुटुंबीयांमार्फक सजावट करण्यात येते.
 
मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी यंदा प्रथमच बारकोड असलेल्या दर्शन कार्डची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. भाविकांची संख्या लक्षात घेऊन मंदिर संस्थानने अत्यंत सूक्ष्मपणे याचे नियोजन केले आहे. प्रत्येक भाविकाची त्यामुळे संगणकीय नोंद होणार आहे. त्यामुळे प्रतिदिवस किती भाविकांनी जगदंबेचे दर्शन घेतले याची अधिकृत आकडेवारीदेखील प्रशासनाकडे उपलब्ध होणार आहे.