1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (15:26 IST)

नाशकातील बनावट बियाणे विक्रीचे रॅकेट उघड

बनावट बियाणे शेतकऱ्यांना विकून फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध नाशकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा बनावट बियाणे विक्रीचा वाद चव्हाट्यावर आला आहे.
एकीकडे शेतकरी जीवाचं रान करून शेती पिकवत असतांना अशा घटनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात बनावट बियाणे विक्रीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
या पार्श्वभूमीवर बनावट खते, कीटकनाशक आणि बियाणे विकणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. बनावट बियाणे शेतकऱ्यांना विकून फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला तर जिल्ह्यातील १४ खत विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत.
याबाबत ओझर, इंदिरानगर आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बनावट बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा सुमारे १० लाखांचा माल देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच माल घ्यावा तसेच शासनमान्य व प्रमाणित बी- बियाणे खरेदी करुन आपली फसवणूक टाळावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.