शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (07:56 IST)

मुंबईकर, फूड अॅपवरून अन्न मागवतात, पण ते येते गलिच्छ झोपडपट्टीतून

अगदी खरे आहे. तुम्ही जर ऑनलाईन अन्न मागवत असाल तर तो तुमच्या जीवाशी खेळ होतो आहे.  अॅपवरून मागवणारा आवडीचा पदार्थ किती घाणेरड्या ठिकाणी बनतोय, हे तुम्हाला कळलं तर किळस येणार आहे.  मुंबईत तब्बल ३४७ फुड आऊटलेट्सवर अन्न व औषध प्रशासनने (एफडीए) धाडी टाकल्या असून हे भीषण सत्य समोर आले आहे.  स्विगी, फूडपांडा, झोमॅटो यासारख्या फुड चैन कंपन्यांकडून पुरविण्यात येणारे अन्न अतिशय घाणेरड्या अवस्थेत तयार होत असल्याचे समोर आले आहे. तसेच  स्वस्त, झटपट आणि भरघोस डिस्काऊंटच्या नावाखाली ग्राहकांना अतिशय सुमार दर्जाचं अन्न पुरवत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येते आहे.  मुंबईच्या बहुतांश झोपडपट्ट्यांमधून अतिशय घाणेरड्या ठिकाणी तयार केलेले अन्न मुंबईभर पुरवठा होत असल्याचे या धाडींच्या निमित्ताने समोर आले आहे.  २१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत एफडीएच्या टीमने एकूण ३४७ धाडी टाकल्या असून त्यातील बहुतांश ठिकाणी अतिशय वाईट चित्र होते. धाडींमध्ये तर ११३ दुकानांकडे अन्नपदार्थ तयार करण्याचा परवाना नसल्याचे समोर आले असून, अन्न तयार करण्यासाठी कोणतीही परवाना नोंदणी केलेली नाही. गोरगाव, मालाड, अंधेरी, भांडुप, चेंबुर, प्रभादेवी आदी भागातून या कंपन्यांना अन्नाचे वितरण करण्यात येत होते. बहुतांश अन्न हे मुंबईतील झोपडपट्टीच्या परिसरातच तयार होत आहे. अन्न तयार करण्यात येणारे किचनचे ठिकाण हे अतिशय घाणेरडे असल्याचे धाडी घालणाऱ्या पथकाच्या निदर्शनास आले आहे.