शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मे 2020 (16:49 IST)

शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राचीच फक्त परीक्षा होणार

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातल्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली आहे. ‘सध्या जे कोर्स सुरू आहेत, त्यामध्ये शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या सत्राचीच फक्त परीक्षा घेतली जाईल. त्याव्यतिरिक्त आधीच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच्या वर्षाच्या आणि या वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेऊन ग्रेडिंग पद्धतीने गुण देऊन पुढील वर्षात पाठवलं जाणार आहे’, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. त्यासोबतच, ‘सर्व अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा देखील युजीसीच्या निर्देशांनुसार १ ते ३० जुलैदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून घेतल्या जातील’, असं देखील त्यांनी जाहीर केलं आहे.
 
‘राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्य सरकारने मिळून विचारपूर्वक हा निर्णय घेतला आहे. सध्याचं कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेता अंतिम वर्गातील अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता आधीच्या मार्कांच्या आधारावर पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना मागच्या वर्षाचा ५० टक्के परफॉर्मन्स आणि या वर्षाचा आत्तापर्यंतचा ५० टक्के परफॉर्मन्स अशा १०० टक्के परफॉर्मन्सच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे.