पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये आजपासून चौदा दिवसांचा कडक लॉकडाउन
महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा हात-पाय पसरायला सुरूवात केली असून नगरसह सोलापूर जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. विठूरायाच्या पंढरीतूनही कोरोनाचे सावट असून जिल्हा प्रशासनाने दहापेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये आजपासून चौदा दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे.
आषाढी वारीमुळे महाराष्ट्रात प्रादूर्भाव वाढू शकतो, या शक्यतेने महाराष्ट्र सरकारने वारीवर निर्बंध लादले होते. त्यामुळे वैष्णवांचा मेळा भरू शकला नव्हता. असे असतानाही पंढरपूर तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे.
या संदर्भात येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी काल संबंधित गावातील सरपंच व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी 21 गावांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. या गावांमध्ये बाहेरगावच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. या शिवाय कोरोना चाचणी व लसीकरण मोहीम राबवली जाणार असल्याचेही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
मागील 13 ऑगस्ट रोजी पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. दहा दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानंतरही पंढरपूर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा तालुक्यातील 21 गावांमध्ये लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. आज तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी गावोगावी जाऊन बंदचे आवाहन केले.
लॉकडाऊन होणारी गावे
कासेगाव, भंडीशेगाव, करपंब, गादेगाव, पटवर्धन कुरोली, भोसे, खेड भाळवणी, रोपळे, लक्ष्मी टाकळी, मेंढापूर, गुरसाळे, उपरी, चळे, खरातवाडी, लोणारवाडी, सुपली, गार्डी, खर्डी, सुस्ते, कोर्टी आंबे.