शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (11:09 IST)

आगीच्या घटना टाळण्यासाठी इलेक्ट्रिकल इंस्पेक्शन करा : ऊर्जामंत्री

शॉर्टसर्किटमूळे व चुकीच्या विद्युत संच मांडणीमुळे होणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी सार्वजनिक व खाजगी रुग्णालयाच्या विद्युत संच मांडणीचे व उदवाहनाचे(लिफ्ट्स) निरीक्षण (इलेक्ट्रिकल इंस्पेक्शन) करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिले आहेत. या संदर्भात ऊर्जा विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ऊर्जा विभागाने काढलेल्या या परिपत्रकात राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक यांना याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
 
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्युत उपकरणांमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे रुग्णालयामध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या असून यात जीवित व वित्त हानी झाली आहे. तसेच कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील खाजगी व सार्वजनिक रुग्णालयावर ताण निर्माण झालेला आहे. त्यामुळे अश्या ठिकाणी विजेचे 
अपघात व आग लागण्याची घटना घडू शकते. त्यामुळे राज्यातील सार्वजनिक व खाजगी रुग्णालयातील विद्युत यंत्रणेचे निरीक्षण करून त्याबाबतचे अभिप्रायासह अहवाल संबंधित आस्थापणेस कळवून त्याचे निराकरण केल्यास विद्युत यंत्रणेमुळे होणारे अपघात टाळणे शक्य होईल. तसेच सदर ठिकाणाच्या उदवाहनाचे निरीक्षण करणेही आवश्यक राहणार आहे,असे आदेश ऊर्जा विभागाने दिले आहेत.
 
सोबतच राज्यातील सार्वजनिक व खाजगी रुग्णालयातील विद्युत संच मांडण्यांचे निरीक्षण करण्यासाठी मानक कार्य पद्धती (SOP) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीला देण्यात यावी व तपासणी सूची तयार करून त्यानुसार तातडीने सर्व रुग्णालयातील विद्युत मांडण्याचे निरीक्षण करण्यात यावे, सदर निरीक्षणांचे अहवाल 
अभिप्राय व त्रुटीसह संबंधित आस्थापनेस कळवून त्याची पूर्तता करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश मुख्य विद्युत निरीक्षकास देण्यात आले आहे. या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.