आनंदवार्ता: शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी
६ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवीन कर्जमाफी योजनेची घोषणा केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना
२ लाखांपर्यंत कर्जमाफी
ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत आहे, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल. तसेच जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहे, त्यांना ५०,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या योजनेचा लाभ राज्यातील सुमारे २८ ते ३० लाख थकीत कर्जदार शेतकऱ्यांना आणि २० लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. या कर्जमाफीसाठी सरकारवर सुमारे ३५,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
तसेच बँकांकडून डेटा संकलनाचे काम सुरू असून, पुढील १-२ महिन्यांत प्रत्यक्षात लाभ मिळण्यास सुरुवात होईल. आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये हे पैसे थेट जमा केले जातील. तसेच कर्जमाफीसोबतच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना देखील सुरूच राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी आणि विरोधी पक्षांनी या योजनेवर टीका केली आहे. "अनेक शेतकऱ्यांचे कर्ज २ लाखांपेक्षा जास्त असल्याने, वरील रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही," असे त्यांचे म्हणणे असून त्यांनी 'सातबारा कोरा' (पूर्ण कर्जमाफी) करण्याची मागणी केली आहे.
Edited By- Dhanashri Naik