मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 13 जुलै 2023 (07:41 IST)

रायगड पालकमंत्री मीच - आ. भरत गोगावले यांचा पुन्हा दावा

BHARAT GOGAWALE
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आम्ही केव्हापासून तयार आहोत. फक्त फोन येऊ द्या, निरोप येऊ द्या, मग आम्ही निघालोच, अशी प्रतिक्रिया महाडचे आमदार भरत गोगावले यांनी दिली. तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मलाच मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना संधी मिळाली नाही, त्यांना दुसर्‍या टप्प्यात संधी मिळेल असं आश्वासन नेत्यांना देण्यात आलं आहे.
 
यामुळे शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय होईल, असा दावा शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी एका खासगी न्युज चॅनलशी बोलताना केला आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी आम्ही केव्हापासूनच तयार आहोत. फक्त फोन येऊ द्या, निरोप येऊ द्या, मग आम्ही निघालोच, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली. गेल्या जून महिन्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले.
 
तेव्हा राज्यातील पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र, दुसर्‍या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही. हिवाळी अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन उलटल्यानंतरही अनेक नेते मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आणि अजित पवारांसह नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यातच, रायगडमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या आदिती तटकरे यांनाही मागून येऊन मंत्रिपद मिळाले, परंतु आ. भरत गोगावले यांना अद्यापही मंत्रीपद दिलेले नाही.