1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Raigad leader Pramod Mhaskar joining the Eknath Shinde Shiv Sena

राजकीय भूकंप! रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर शिंदे गटाच्या वाटेवर

रायगड, १६ नोव्हेंबर: रायगड जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कुटुंबाचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे प्रमोद म्हसकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, हा पक्षप्रवेश सोहळा तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रोहा शहरातच पार पडणार असल्याने याला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी रोहा येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे. काही दिवसांपूर्वीच म्हसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हापासून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर त्यांनी शिवसेनेत जाण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुरेश मगर आणि आप्पा देशमुख हेदेखील शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
 
जिल्ह्याच्या राजकारणावर होणार परिणाम
'प्रमोद म्हसकर प्रतिष्ठान'च्या माध्यमातून म्हसकर गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. रोहा आणि पेणसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा फटका केवळ एका मतदारसंघाला न बसता संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक ताकदीला बसण्याची शक्यता आहे.
 
महायुतीतील मित्रपक्षांमध्येच वर्चस्वाची लढाई?
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले, तरी रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. श्रीवर्धन, रोहा, माणगाव आणि पेण या भागांत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच माणगावमधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता रोह्यातून म्हसकर यांना आपल्या गोटात ओढून शिवसेनेने रायगडमध्ये आपली ताकद वाढवण्याचा आणि राष्ट्रवादीला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
पुढील लेख
LIVE: ह. भ. प. दौलत महाराज सातपुते यांचा संशयास्पद मृत्यू