1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (21:22 IST)

नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

rain
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहरात सकाळच्या सुमारास ऊन तर दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसह नागरिकांचे तारांबळ उडत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागांत देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
 
गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे सायंकाळी चार वाजता गंगापूर धरणातून २२७२ क्यूसेसने विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून प्रशासनाने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सध्या गंगापूर धरणात ९७ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून धरण समूहात ८४ टक्के पाणी आहे.
 
दरम्यान, सकाळी नाशिक शहरातील काही भागांत ढगाळ वातावरण तर काही भागांत ९ ते १० वाजेच्या सुमारास कडक ऊन पडले होते. मात्र, त्यानंतर ११ वाजेच्या सुमारास ढग दाटून आले आणि दुपारी १२ वाजता शहरातील विविध परिसरात तुफान पाऊस कोसळला. यानंतर पुन्हा दुपारी तीन वाजता विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला असून शहरातील रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.