मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 मे 2021 (07:58 IST)

रेमडेसिविरचा काळाबाजार सुरुच, 1 लाखात 3 इंजेक्शन विकणाऱ्या तिघांना अटक

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार अजूनही सुरुच असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने 1 लाख 5 हजार रुपयात 3 रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना अटक केली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल बाबूराव जाधव (वय 24, रा. आंबेगाव पठार), मयूर विजय चव्हाण (वय 22, वराळे, तळेगाव दाभाडे पुणे) आणि शामली चंद्रकांत अकोलकर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. औषध निरीक्षक सुहास तानाजी सावंत यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
 
या प्रकरणी अधिक माहिती, खंडणीविरोधी पथकाचे कर्मचारी राजेंद्र लांडगे आणि विवेक जाधव यांना वरील आरोपी रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणार असल्याची माहिती मिळाली होती. 37 हजार रुपये किमतीला 1 इंजेक्शन ते विकणार होते. बातमीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी आणि बनावट ग्राहक पाठवले असता वरील आरोपींनी तीन इंजेक्शन 1 लाख 5 हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या तिघांनाही नवले ब्रिज ते कात्रज चौकाकडे जाणाऱ्या रोडच्या डाव्या बाजूवरुन ताब्यात घेतले.
 
त्यांच्या ताब्यातून 3 इंजेक्शन दोन मोबाईल आणि चार चाकी कार असा एकूण आठ लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.