राष्ट्रवादीचे कोकणात आंदोलन
राज्यातील तमाम शेतकरी तसेच कोकणातील आंबा बागायतदार व मत्स्योत्पादकांना तात्काळ कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी सुरू केलेल्या संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत आहे. या संघर्षयात्रेच्या उद्देशाला अधिक बळ देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने रस्त्यावर उतरण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत हा लढा संपूर्ण राज्यभर सुरूच राहील, असे रा.वि.काँने स्पष्ट केले आहे. त्याअंतर्गत आज रत्नागिरी येथे कर्जमाफीसाठी हे आंदोलन करण्यात आले.