२४ डिसेंबरचा संविधान महामोर्चा स्थगित
राज्यातील बॊध्द एस सी एस टी भटके विमुक्त ओबीसी व अल्पसंख्यांक समूहाच्या प्रश्नांवर मुंबईत २४ डिसेंबर २०१६रोजी आझाद मैदान येथे काढण्यात येणारा संविधान गौरव महामोर्चा रद्द करून पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती संविधान गौरव बहुजन महामोर्चा कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आली . एकाच विषयावर चार वेगवेगळे चार मोर्चे समितीला मान्य नसून सर्वसमावेशक असा एकच महामोर्चा काढण्यासाठी हि समिती प्रयत्नशील राहणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे .
अट्रोसिटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसह एससी एसटी भटके विमुक्त ओबीसी व अल्पसंख्याक समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील तरुणांनी एकत्र येऊन एक सर्वसमावेशक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता सदर निर्णयास अनुसरून विविध समाजघटक , सर्वपक्षीय बौद्ध,एस.सी, एस.टी भटके विमुक्त ओबीसी व अल्पसंख्यांक लोकप्रतिनिधी विविध संस्था संघटना आदींच्या गाठीभेटी घेतल्या , मुंबईत ठिकठिकाणी बैठका घेऊन वातावरण निर्मिती केली होती , शिवाय २६ नोव्हेंबर रोजी चेंबूर ते चैत्यभूमी अशी २५ हजार लोकांचा समावेश असलेली संविधान गौरव बाईक मोटार रॅली काढली होती. एकंदरीत तयारी, पोलीस परवानगी , स्टिकर्स , हॅंडबिल्स , व कटआऊट बॅनर च्या माध्यमातून ५ व ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीसह मुंबईत ठिकठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात या महामोर्चाची तयारी कृती समिती व समाजाने केली होती ,
दरम्यानच्या काळात समाजातील विविध मान्यवर नेत्यांनी २४ डिसेंबर , २१ जानेवारी आणि जानेवारीचा तिसरा आठवडा असे वेगवेगळ्या तारखेचे तीन मोर्चे मुंबईत घोषित केले . राज्यातील मागासवर्गीय , अल्पसंख्यांक ओबोसी भटके विमुक्त आदी समाजाच्या प्रश्नांवर जिल्हानिहाय सर्वसमावेशक एकच लाखोंचे मोर्चे निघत असताना आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एकाच प्रश्नावर वेगवेगळे मोर्चे कशासाठी व कोणासाठी त्यातून काय साध्य होणार आहे असा सवाल संविधान गौरव बहुजन महामोर्चा कृती समितीने केला आहे . यासंदर्भात या तीन मोर्च्याच्या सर्व आयोजकांसोबत एकच मोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे , या प्रक्रियेला लागणारा कालावधी व समाजाचे हित लक्षात घेता दोन पाऊले मागे घेऊन शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईच्या आझाद मैदान येथे होत असलेला समाजाचा संविधान गौरव बहुजन महामोर्चा स्थगित करून पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती या कृती समितीच्या वतीने आज देण्यात आली . वेगवेगळे मोर्चे काढून समाजात दुहीचे वातावरण कुणीही निर्माण करू नये समाज अशा कृत्याचे समर्थन करणार नाही असे आवाहन कृती समितीने यावेळी केले .