1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 डिसेंबर 2021 (20:18 IST)

शरद पवार यांनी सांगितला राजकारणात यशस्वी व्हायचा मंत्र

Sharad Pawar said the mantra to be successful in politics शरद पवार यांनी सांगितला राजकारणात यशस्वी व्हायचा मंत्रMaharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
"राजकारणामध्ये कमी कष्टानं आणि कमी भांडवलानंही यश मिळतं, फक्त समोरच्या व्यक्तीचं नाव तुम्ही लक्षात ठेवायला हवं."
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा सल्ला दिला आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 'नेमकचि बोलणे' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या पुस्तकामध्ये शरद पवार यांची काही भाषणं देण्यात आलेली आहेत.
या प्रकाशन सोहळ्यामध्ये अभिनेते आणि कवी किशोर कदम यांनी शरद पवारांना सगळ्यांची नावं लक्षात ठेवणं कसं शक्य होतं, असं विचारलं त्यावेळी शरद पवारांनी याबाबतचा एक किस्सा सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
 
लोकं लहान गोष्टींतही समाधानी-पवार
किशोर कदम यांनी शरद पवारांना, तुम्ही भेटलेल्या सर्वांची नावं लक्षात ठेवता, याची ट्रिक काय? असा प्रश्न केला.
त्यावर शरद पवार म्हणाले की, "राजकारणामध्ये कमी कष्टानं आणि कमी भांडवलानंही यश मिळतं, फक्त समोरच्या व्यक्तीचं नाव तुम्ही लक्षात ठेवायला हवं."
त्यांनंतर पवार यांनी ते मुख्यमंत्री असतानाचा एक किस्सा सांगत, नाव लक्षात ठेवल्याचा फायदा कसा होतो, हे सांगितलं.
"मुख्यमंत्री असताना एके दिवशी माझ्या मतदारसंघातली एक महिला मला भेटायला आली. तिचं नेमकं काम ऐकून घेण्याआधीच मी तिला विचारलं, 'काय गं कुसुम, काय काम काढलं मुंबईला'."
तेवढं ऐकूुच, "साहेबांनी मला कुसुम म्हणून हाक मारली, आता काम होवो ना होवो, अशी लोकांची भावना असते. ते फार लहान-लहान गोष्टींमध्ये समाधानी होत असतात," असंही पवार म्हणाले.
"अशा गोष्टी जाणीवपूर्वक लक्षात ठेवल्या तर त्याचा फायदा होतो. मी राजकारणात असे एक-दोन लोकं पाहिले आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा त्यात समावेश होता.
"कितीही जुनी ओळख असलेल्या व्यक्तीचं नाव त्यांच्या लक्षात राहत होतं. या गुणामुळं समाजात कायम स्वरूपी स्थान प्राप्त व्हायला यश मिळालं," असं देखील पवार यांनी यावेळी सांगितलं.
या कार्यक्रमात असेच इतरही काही किस्से उपस्थितांनी सांगितले. पुस्तकाचे लेखक सुधीर भोंगळे यांनीही यावेळी शरद पवारांचा टेम्पो चालवण्याचा एक किस्सा सांगत, त्यांच्या धडाडीचं कौतुक केलं.