मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (14:49 IST)

समृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि अहमदनगरचा असा होणार कायापालट

samruddhi-mahamarg
शिर्डी– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. समृध्दी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी ५ किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृध्दी महामार्गालगत जिल्ह्यात २ कृषी समृध्दी उभारण्यात येणार आहेत. यामुळे शिर्डी व अहमदनगर परिसरातील कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगार वाढणार आहे. समृध्दीमुळे शिर्डीत देशविदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या ही वाढणार आहे. शिर्डी व परिसराच्या विकासाला बूस्ट मिळणार आहे.
 
राज्याच्या दरडोई उत्पन्नात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या मोजक्या शहरांचा हातभार लाभला आहे. अहमदनगर जिल्हा साखरेचे कोठार आहे. कृषी दृष्टया संपन्न जिल्हा आहे. दळण-वळण साधनांअभावी जिल्ह्यातील काही भाग विकासापासून मागे राहिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्ग शिर्डी परिसर व अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे.
 
अहमदनगर १० जिल्ह्यांशी प्रत्यक्ष व १४ जिल्ह्याशी अप्रत्यक्ष जोडले जाणार
समृद्धी महामार्गात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्‍यातील १० गावे येतात. जिल्ह्यातील या रस्त्याची लांबी धोत्रे ते दर्डे कोऱ्हाळे ( २९.४० किमी ) इतकी तर रुंदी १२० मीटर इतकी आहे. समृध्दी द्रुतगती मार्गाचा डिझाइन स्पीड १५० कि.मी. / प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून १०० कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर मुंबईपासून शिर्डी येण्यास अवघे दोन तास लागतील. नागपूरहून शिर्डी येण्यास अवद्ये ५ तास लागतील. समृध्दी महामार्गाला अहमदनगरशी जोडणारा मनमाड-नगर रस्त्याच्या कामास जानेवारी २०२३ पासून सुरूवात होत आहे. हा रस्ता डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समृध्दी महामागापर्यंत पोहचण्यासाठी वेगवान संपर्क उपलब्ध असणार आहे. त्यामुळे साहजिकच औद्योगिक तसेच कृषी मालाची वाहतूक विनाअडथळा आणि वेगवान पद्धतीने होऊ शकणार आहे.
 
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखाने, कृषी उद्योग, दूध व्यवसाय, भाजीपाला, फळे-फुले पिकविणारे शेतकरी व व्यावसायिकांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. येत्या दशकात महाराष्ट्राचे आर्थिक चित्र बदलण्याचे सामर्थ्य असलेला हा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धतेचे प्रतीक ठरेल, यात शंका नाही.
 
पर्यटनवाढीलाही चालना, कृषी समृद्धी केंद्रे आणि रोजगार
समृध्दी महामार्गामुळे शिर्डी, शनि शिंगणापूर, ज्ञानेश्वर मंदीर (नेवासा),देवगड आदी पर्यटन स्थळे इतर जिल्ह्यांच्या नजीक येणार आहेत. शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने ही रस्ता वरदान ठरणार आहे. त्यामुळे सहाजिकच शिर्डीतील भाविकांची संख्या वाढून रोजगाराला चालना मिळणार आहे. कोपरगांव तालुक्यातील धोत्रे व राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे केली जाणार आहे. सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर विकसित केले जाणारे प्रत्येक कृषी समृद्धी केंद्र स्वयंपूर्ण नवनगर असेल. नियोजनबद्ध विकास हे या नवनगरांचे वैशिष्ट्य असेल. या नवनगरांमध्ये शेतीला पूरक उद्योग असतील, तसेच औद्योगिक उत्पादनासाठी काही भूखंड राखीव असतील. शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, मोकळे रस्ते, निवासी इमारती, इत्यादी सुविधा या नवनगरांमध्ये असतील एका कृषी समृद्धी केंद्रात ३० हजार थेट तर ६० हजार अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे नवनगरांच्या माध्यमातून भविष्यात १५ ते २० लाख नवीन रोजगारांची संधी निर्माण होणार आहे.
 
सीएनजीचा विनाअडथळा पुरवठा
शिर्डी व अहमदनगर जिल्ह्याला सीएनजीचा टँकरद्वारे पुरवठा होत असतो. त्यामुळे जिल्ह्यात मोजक्याच पंपावर तास व दीड तासासाठी सीएनजी उपलब्ध होते. समृध्दी महामार्गालगत गॅस अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला चोवीस तास पर्यायी नैसर्गिक इंधन उपलब्ध होणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor