शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (09:02 IST)

संजय राऊतांना अटक होताच उद्धव ठाकरेंनी घेतला हा मोठा निर्णय

uddhav thackeray
शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून अटक होताच त्याची गंभीर दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. राऊत यांना अटक होणे म्हणजे उद्धव यांचा एक हात जायबंदी होण्यासारखे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शिंदे गटाच्या आव्हानासह पक्षातील फाटाफुट थाबविण्यासाठी उद्धव यांनी कसोशीने प्रयत्न सुरू केले असताना राऊत यांना अटक झाली आहे. त्यामुळेच उद्धव यांनी तातडीने शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राऊत यांच्या अटकेनंतर पुढे काय करायचे याबाबतची रणनीती या बैठकीत ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
शिवसेना नेते संजय राऊत यांना रात्री एकच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर काल सकाळी ७ वाजता ईडीने धाड मारली. तब्बल साडेनऊ तासांच्या झाडाझडतीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर राऊत यांची दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथील ईडीच्या कार्यालयात चौकशी करण्यात आली. नंतर रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी राऊतांना अटक केली. गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली आहे.
 
या सगळ्या प्रकरणामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. राऊत यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढे काय करायचे, यावर चर्चा होणार आहे. शिवसेनेच्या इतरही नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांना ईडीकडून अटक होणं हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 
शिवसेनेत पडलेली फूट, कोर्टात सुरू असलेले खटले आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांना अटक करण्यात आल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. तसेच राऊत यांना ईडीच्या कोठडीतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवरच ठरवून कारवाई केली जात असल्याने शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे.
 
राऊत यांच्या एकेकाळच्या सहकारी स्वप्ना पाटकर यांनी राऊतांविरोधात वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वप्ना पाटकर यांनी वाकोला पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आहे. लैंगिक अत्याचार करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी स्वप्ना पाटकर यांना देण्यात आली होती. त्यामुळे राऊत यांच्या विरोधात भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.