गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 नोव्हेंबर 2020 (16:06 IST)

खबरदारीचे सर्व उपाय करत राज्यातील सर्व मंदिरे सुरू

राज्यातील सर्व मंदिरे सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिराकडून भाविकांसाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. तसेच ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांच्यासाठी एक खिडकी योजनेची सोयही करण्यात आली असल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.
 
मोबाईल अ‍ॅपवरील क्यूआर कोड दाखवून भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिराकडून घेण्यात आला आहे. शरिराचं तापमान मोजून आणि मास्क घातला असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. प्रतितास 100 या प्रमाणे क्यूआर कोड तपासून भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या अ‍ॅपवरुन 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मात्र, पुढे परिस्थिती पाहून ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्णय घेतला जाणार आहे. दिवसाला 1 हजार नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 12 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. 
 
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाईन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.
 
 शिर्डीत  भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शन घेता येणार आहे.  सुरुवातीला सहा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन घेता येईल. हळूहळू ही संख्या वाढवण्यात येईल. ६५ वर्षांवरील वृद्धांना दर्शनाची अनुमती नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था असेल. भाविकाला ताप असेल तर त्यास तत्काळ संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात येईल. भाविक कोरोनाबाधित आढळला तर त्याला संस्थानच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. रोज दर्शन घेणार्‍या भाविकांमधून किमान पन्नास भाविकांना आठवडाभराने फोन करून तब्येतीविषयी त्यांच्याकडून फिडबॅक घेतला जाणार आहे.
 
भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. मात्र, चावडी आणि मारूती मंदिरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. समाधी दर्शनानंतर बॅरिकेडिंगमधून पाच नंबर गेटने भाविकांना बाहेर पाठवले जाईल. भाविकांना मंदिरात हार, प्रसाद आदी पूजा साहित्य नेता येणार नाही. सत्यनारायण, अभिषेक पूजा, ध्यानमंदिर, पारायण कक्ष बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना केवळ उदी देण्यात येईल, बुंदी प्रसाद किंवा दर्शन रांगेतील कॅन्टीनमध्ये चहा-बिस्किटे मिळणार नाहीत. प्रसादालय व भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे.भक्तनिवासात रोज एकाआड एक रूम देण्यात येणार आहे.