सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (20:47 IST)

राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा : नाना पटोले

nana patole
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा छदामही अजून मिळालेला नाही, पंचनामे करण्यातही प्रशासन ढिम्म असून आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
 
यासंदर्भात बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, यावर्षी शेतकऱ्यावर निसर्गाने अवकृपा केली. राज्यातील विदर्भ, मराठावड्यासह काही भागात अतिवृष्टी झाली, त्यात शेतातील उभे पीक वाया गेले. सोयाबीन, कपाशी, तुर, मका, बाजारी पिकं हातातून गेली. फळबागा व पालेभाज्यांनाही या पावसाचा फटका बसला, पशुधनाचेही नुकसान झाले.
 
अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारने तातडीने हालचाली करून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे होते पण तसे झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने नैसर्गिक आपत्ती ओढवताच तात्काळ दहा हजार रुपयांची रोख मदत दिली व नंतर १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. मविआचे सरकार येताच पहिला निर्णय शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले. अटी, शर्थी, नियमांचे अडथळे निर्माण करुन शेतकऱ्याला ऑनलाईनच्या रांगेत दिवसरात्र उभे केले नाही. शेतकरी हा सरकारचा प्राधान्यक्रम असला पाहिजे पण भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी असल्याने मदतीसाठी हात आखडताच घेतला जातो.
 
काँग्रेस पक्षाने याधीच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती पण राज्यातील ईडी सरकारने शेतकऱ्यांकडे साफ दुर्लक्ष केले. आताही परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची यंदाची उरली सुरली स्वप्नेही धुळीस मिळवली आहेत पण सरकारला त्यांच्यातील भांडणातूनच वेळ मिळत नाही. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून सरकारने लवकारत लवकर ओला दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना मदत केली नाही, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Edited By -Ratnadeep Ranshoor