गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 3 एप्रिल 2021 (07:14 IST)

आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागणार, टोपे यांनी दिले संकेत

राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. एका मराठी वृत्तवाहिनीश संवाद साधताना त्यांनी हे संकेत दिले. देशात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ८ जिल्हे आहेत. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगरचा समावेश आहे. 
 
राजेश टोपे यांनी कडक निर्बंध लावण्यात येतील असे संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. बेड्स, ऑक्सिजन, कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा झाली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही त्या ठिकाणी अधिक निर्बंध करुन गर्दी कशी टाळली जाईल याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
 
लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने निर्बंध कडक करावे लागत आहेत, असं राजेश टोपे म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द न वापरता निर्बंध लावले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती केली आहे. नाईट कर्फ्यू लावले आहेत. निर्बंध लावल्यानंतर गर्दी वाढतेय. त्यामुळे कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. लोकांनी काही दिवस नियमांचं पालन केलं तर लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. ज्यावेळी संसाधनं संपतात त्यावेळी चैन ब्रेक करण्यासाठी तातडीचा इलाज म्हणून लॉकडाऊन लावावा लागतो.