शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2017 (12:14 IST)

आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम

गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेच्या लाटेत महाराष्ट्र होरपळून निघत असून आणखी दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

सौराष्ट्र, कच्छ भागात उष्णतेची लाट कायम असून, तेथे कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंशाने वाढले आहे़ गुजरात, पश्चिम राजस्थान येथून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्र तापला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील तब्बल २२ शहरांचे कमाल तापमान ४० अंशावर नोंदवण्यात आले आहे. मुंबईचे कमाल तापमानही ३५ अंशावर स्थिर असून, वाढता उकाडा मुंबईकरांचा घाम काढत आहे. मुंबईत उष्ण आणि कोरडे वारे वाहत असून, आर्द्रतेमध्येही वाढ होत आहे.