बुधवार, 10 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जळगाव घरकुल घोटाळा : सुरेश जैन दोषी

suresh jain guilty in gharkul scam
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिवसेना सुरेश जैन, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह सगळ्या आरोपींना दोषी जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल देताना न्यायालयाने सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह सर्व ४८ आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. आता  जिल्हा न्यायालय या सर्वांना शिक्षा जाहीर करणार आहे.
 
घरकुल योजना ही जळगाव नगरपालिकेची योजना होती. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना स्वस्त दरात चांगली घरं देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी ११० कोटींचे कर्ज काढून ११ हजार घरकुले बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली.
 
मात्र २००१ मध्ये या योजनेतला घोळ समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवहार हे सगळे प्रकार उघडकीस आले. पालिकेने ज्या जागेवर घरकुलं बांधली ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. या योजनेसाठी बिगरशेती परवानगी घेण्यात आली नव्हती. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतल्या बिल्डर्सना हे काम दिले. ठेकेदारांना २९ कोटी रुपये बिनव्याजी आणि आगाऊ देण्यात आले होते. ठेकेदाराला विविध प्रकारच्या सवलती देण्यात आल्या होत्या. निविदेमधील काम वेळेत पूर्ण करण्याची मर्यादा ठेकेदाराने पाळली नाही. तरीही कामाला पाच वर्षांपेक्षा जास्त विलंब करणाऱ्या ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही.