मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 21 जून 2022 (13:30 IST)

राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया, तीन महिने वॉकरच्या साथीने

Raj Thackeray
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात सोमवारी त्यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल दीड तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असली तरी पुढचे काही महिने राज ठाकरे यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
 
या काळात राज ठाकरे यांना कोणतीही सभा किंवा पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येणार नाही. राज्यातील महापालिकांच्या निवडणुकाही अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशा काळात राज ठाकरे यांनाच घराबाहेर पडता न येणे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.
 
राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. जलील पारकर आणि डॉ. विनोद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली.
 
येत्या चार ते पाच दिवसांमध्ये राज ठाकरे यांना रुग्णालयातून घरी सोडले जाईल. मात्र, घरी गेल्यानंतर राज ठाकरे यांना फिजिओथेरपी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या शारीरिक हालचाली या पूर्वीसारख्या सहज होण्यास मदत होईल. मात्र, या काळात राज ठाकरे यांना संपूर्णपणे आराम करावा लागणार आहे.