गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (17:11 IST)

तळेगावात जनजीवन पूर्वपदावर

तळेगाव येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर निर्माण झालेला तणाव आता कमी झाला. गावातील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सोबतच संवेदनशील असलेल्या आठ गावांमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे गाव सोडून गेलेल्या नागरिकांनी घरी येण्यास सुरुवात केली आहे. मात्र या गावांमधला पोलिस बंदोबस्त अजून काही दिवस कायम ठेवला जाणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली़ आहे. 
 
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर दंगल सदृश्य वातावरण झाले होते. काही घरे, एटीबस आणि खाजगी वाहने जाळण्यात आली होती.  या दंगलीचे लोण हळूहळू शहरासह ग्रामीण भागातही पसरले होते़. त्यानंतर संवेदनशील असलेल्या आठ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना न घडल्याने जिल्हा प्रशासनाने संपूर्ण संचारबंदी हटविण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधीक्षक शिंदे यांनी सांगितले़ आहे़. 
 
संचारबंदी मागे घेण्यात आल्यामुळे काही दिवसांपासून जवळच्या नातेवाइकांकडे आश्रयासाठी  गेलेल्या नागरिकांनी पुन्हा आपापल्या गावात यायला सुरवात केली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी अशा कुटुंबांची भेट घेऊन प्रशासनाकडून पूर्ण संरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले आहे. काही घरे हल्ल्यात पूर्णपणे उथवस्थ झाली आहेत. सदरच्या घरातील लोकांनी त्यांची आवरासावर सुरू केली आहे. हल्ल्यात नष्ट झालेल्या सामानाची विल्हेवाट, राहिलेल्या साहित्याची आवरासावर करतांना लोक दिसत आहेत.