बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2019 (09:48 IST)

तापमानातील वाढ कायम, काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानातील वाढ कायम आहे. नगर येथे गुरुवारी राज्यातील उच्चांकी ४२.३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सोलापूर येथे ४२.२ तापमान नोंदविण्यात आले. या दोन्ही शहरांसह जळगाव, मालेगाव, सांगली, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ आदी ठिकाणी तापमान ४० ते ४१ अंशांवर पोहोचले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूर, वाशिम आदी ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या अगदी जवळ आहे. 
 
राज्यात पुढील चार ते पाच दिवस उन्हाचा चटका आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे शनिवारपासून कोकण विभाग वगळता इतर ठिकाणी पावसाला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि उस्मानाबाद काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.