गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 जुलै 2019 (09:45 IST)

सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका, पक्ष उरलाय का? असा केला प्रश्न

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. आता बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीनंतर आता शिवसेनेने या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली खरी पण नेतृत्व करायला पक्ष उरलाय का? असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.
 
काँग्रेस पक्षाला अद्यापि राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, पण महाराष्ट्राला मात्र अखेर नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. अशोक चव्हाण यांच्या रिकाम्या जागी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे. चव्हाण गेले व थोरात आले. अर्थात त्यामुळे असा काय फरक पडणार आहे? काँग्रेसचे आभाळ फाटून पार जमीनदोस्त झाले आहे. पक्ष जमिनीवर शिल्लक नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसची वतनदारी केली, सर्वोच्च पदे मिळवली असे सर्व प्रमुख लोक महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात काँग्रेसचा त्याग करीत आहेत. महाराष्ट्रातही वेगळे काही घडताना दिसत नाही. काँग्रेस हा राजकीय पक्ष नसून विचार आणि संस्कृती आहे असे सतत सांगितले जाते. हा विचार, संस्कृती आणि बरेच काही भाजप किंवा शिवसेनेत रोजच विलीन होताना दिसत आहे. काँग्रेसला राजकीय भविष्य उरलेले नाही. त्यामुळे या ओसाड वाडय़ात आता कोणते विचार, कोणत्या संस्कृतीचे रोपटे लागणार हा विचार अनेकांनी केला आणि या वाडय़ातून काढता पाय घेतला. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपात विलीन झाले, त्याचप्रमाणे गोवा विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते १० आमदारांसह भाजपात विरघळून गेले आहेत. राज्यात हीच अवस्था आहे. या अवस्थेतून काँग्रेसला बाहेर काढण्याचे आव्हान बाळासाहेब थोरातांवर आहे.