शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (08:12 IST)

32 लाख घरांवर तिरंगा फडकवण्याचे केले विभागीय आयुक्तांनी आवाहन

नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आयोजन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. ‘घरोघरी तिरंगा’ मोहिमेच्या अनुषंगाने नाशिक विभागातील ग्रामीण भागात 27 लाख आणि शहरी भागात 5 लाख घरे अशा एकूण 32 लाख घरांवर नागरिकांनी राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन विभागीय आयुक्‍त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.
 
घरोघरी तिरंगा मोहिमेसाठी विभागात विविध माध्यमातून राष्ट्रध्वज उपलब्ध होत आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, ग्रामपंचायती, स्वस्त धान्य दुकाने, बचत गट इत्यादी माध्यमातून राष्ट्रध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. त्यासाठी ध्वज संहिते मध्ये दूरुस्ती करण्यात आली असून 13 ऑगस्टला झेंडा फडकवल्यानंतर 15 तारखेपर्यंत सतत फडकवता येणार आहे. रात्री उतरवला नाहीतरी चालणार आहे.
 
पुढे बोलतांना श्री.गमे म्हणाले की, ध्वजसंहितेमध्ये दुरुस्ती करुन पॉलीस्टर कापडाचा, मशिनने तयार केलेला राष्ट्रध्वज देखील वापरता येणार आहे. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय यंत्रणा यांचेमार्फत राष्ट्रध्वजाचे वितरणही सुरु आहे.