शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (07:13 IST)

राज्याचे पावसाळी अधिवेशन सोमवार पासून

mantralaya
राज्याचे पावसाळी अधिवेशन सोमवार पासून सुरु होत असून, अधिवेशन 19 दिवसांचे  असून कामकाज 15  दिवस चालणार आहे.  यंदाचे पावसाळी अधिवेशन विविध मुद्द्यांवरून गाजणार आहे.
 
लांबणीवर पडलेला पाऊस, दुबार पेरणीचे घोंघावते संकट, बोगस बियाणे अशा शेतकऱ्यांच्या सध्या समस्या आहेत. राज्यातील गुन्हेगारी, महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ या मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. याशिवाय महसूल व शिक्षक बदल्यांमधील भ्रष्टाचार, मंत्री अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचे घोटाळे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेची लांबलेली चौकशी, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात, राज्यातील वाढती बेकारी आणि राज्याबाहेर जाणारे उद्योग; यांसारख्या विविध मुद्द्यांवरून यंदाचे पावसाळी अधिवेशन गाजणार आहे.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात बंड झाल्यानंतर कोणते आमदार शरद पवार यांच्या गटात तर कोणते आमदार अजित पवार यांच्या गटात; याबाबत अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही. अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंढे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे ते आमदार विधिमंडळात आता विरोधी बाकांवरून सत्ताधारी बाकांवर बसतील.  राष्ट्रवादीचे अन्य कोणते आमदार सत्ताधारी बाकांवर म्हणजेच अजित पवार यांच्या गटात बसतील आणि कोणते आमदार विरोधी बाकांवर म्हणजेच शरद पवार यांच्या गटात बसतील,हे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समजणार आहे. 

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे नेते शिंदे गट आणि भाजपच्या मंत्र्यांपेक्षा ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळण्याची शक्यता आहे. 
 
विधानसभेत विरोधी बाकांवर भास्कर जाधव, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते बसतील. विधान परिषदेत उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विलास पोतनीस सचिन अहिर, शेकापचे जयंत पाटील, बंटी पाटील, भाई जगताप, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे हे विरोधी बाकांवर असतील.
 
Edited by - Priya Dixit