रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (14:58 IST)

नाशिकमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग इतक्या टक्क्यांनी वाढला; मालेगावकडे सगळ्यांचे लक्ष

vaccine
जिल्ह्यामध्ये लसीकरणाने चांगलाच जोर पकडला असून, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन आठवड्यांमध्ये लसीकरणाच्या पहिल्या डोसचे प्रमाण 3.24 टक्के इतके वाढले आहे. शासनाने कोरोना महामारीचे सर्व निर्बंध शिथिल केले असल्याने या माहामारीपरसून आपण स्वत: व इतरांनाही सुरक्षित करण्यासाठी नागरीकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.जिल्ह्यात लसीकरणाचे शंभर टक्के उद्दीष्टे साद्य करण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच प्रशासकीय पातळीवरही वेळोवेळी बैठका घेवून लसीकरण पूर्ण करण्यासाठी नियोजन करून काम करण्यात येत आहे. यामुळेच जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या डोसमध्ये 1 लाख 86 हजार 668 तर दुसऱ्या डोसमध्ये 4 लाख 14 हजार 095 इतकी वाढ झालेली पहावयास मिळत आहे. मालेगाव महापालिकेमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी असल्यामुळे तेथे अधिकाधिक प्रचार व प्रसार आणि लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यावर भर दिला जात आहे.
 
आठवड्याच्या दर मंगळवारी दुपारी चार वाजता सर्व तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेऊन आढावा घेण्यात येत आहे. या बैठकीत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनाही उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण अशा सर्व यंत्रणांचा समन्वय साधून सामूहिकरीत्या हे काम पुर्ण करण्याचे इंद्रधनुष्य जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने उचलले आहे.आतापर्यंत जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, चांदवड, कळवण, पेठ, देवळा, बागलाण, सुरगाणा या तालुक्यांमध्ये 90 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात 69.13 टक्के लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण करण्यात आला आहे. तसेच नाशिक ग्रामीण 74.10 टक्के, महापालिका क्षेत्रात 73.85 टक्के आणि मालेगाव महापालिका क्षेत्रात 22.99 टक्के इतके लसीकरण करण्यात आले आहे.
 
जिल्ह्यातील 12 ते 14 वर्षे वयोगटांमध्ये 60 टक्के लसीकरण पूर्ण झाले असून, राज्यामध्ये नाशिक जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. यामध्ये जिल्ह्यातील 2 लाख 21 हजार 842 एवढे विद्यार्थी असून त्यापैंकी 1 लाख 33 हजार 284 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच 15 वर्षा वयोगटातील लसीकरणाला सुरूवात झाली असून, आता पर्यंत 87.86 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. तर या वयोगटातील नाशिक ग्रामीण मध्ये 90.07 टक्के  तर महापालिका क्षेत्रात 92 टक्के आणि मालेगाव महापालिका क्षेत्रात 61.77 टक्के लसीकरण करण्यात आले आहे.लसीकरणाच्या कामांमध्ये स्वदेश फाउंडेशन, जीविका हेल्थकेअर व केअर इंडिया या सामाजिक संस्थांनी प्रशासनाला एकुण 28 मोबाईल व्हॅन उपलब्ध करून दिल्याने दुर्गम भागामध्ये नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी यश मिळाले आहे. याबरोबरच मराठवाडा ग्रामीण विकास संस्था देखील समाज प्रबोधनामध्ये प्रशासनास चांगली साथ देत असल्याने या सर्वांचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आभारही मानले आहे