चोराने नोजल उघडेच ठेवले! कर्मचारी झोपले राहिले; ३०० लिटर पेट्रोल जमिनीवर सांडले; वाशिम मधील घटना
महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील केनवड गावातील साईजी पेट्रोल पंपावर चोरीची एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा, कर्मचारी झोपलेले असताना एका अज्ञात तरुणाने पंप मशीन चालू करून पेट्रोल चोरले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावरील कर्मचारी रात्री आराम करत होते. त्याचवेळी, एक तरुण पंपावर आला, त्याने कोणाच्याही मदतीशिवाय मशीन चालवले आणि आपल्या कॅनमध्ये पेट्रोल भरले. पेट्रोल भरल्यानंतर, तो नोजल बंद न करताच पसार झाला. आरोपीने जाताना पेट्रोलचे नोजल व्यवस्थित बंद केले नाही. यामुळे अंदाजे २०० ते ३०० लिटर पेट्रोल जमिनीवर सांडले, परिणामी पेट्रोल पंप चालकाचे आर्थिक नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच, पेट्रोल पंप व्यवस्थापनाने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.
Edited By- Dhanashri Naik
