मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (21:39 IST)

राजकीय चर्चाच झाली नाही, त्यामुळे कोणती समीकरणं यातून निघणार?” मुख्यमंत्र्यांचा सवाल

shinde
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. गणरायाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांनी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात असलं, तरी त्यातून युतीबाबतची राजकीय चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारली आहे. “सगळीकडे गणपतीचं आगमन झालं आहे. उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकमेकांकडे जात असतो. त्यामुळे आज मी गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंकडे आलो आहे. ही सदिच्छा भेट होती. त्यांचं मध्यंतरी ऑपरेशन झालं होतं प्रकृतीची विचारपूस आणि गणपती दर्शन यासाठी मी आलो होतो. राजकीय चर्चाच झाली नाही. त्यामुळे कोणती समीकरणं यातून निघणार?” असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.
 
दरम्यान, या भेटीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना आठवणींविषयी विचारणा केली असता त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला. “मी राज ठाकरेंचं ऑपरेशन झालं, तेव्हाच येणार होतो. पण आज गणपतीचा योगायोग होता. त्यांच्या गणपतीचं आजच विसर्जन आहे. त्यामुळे मी आलो. दिघेसाहेबांच्या आठवणी देखील चर्चेतून निघाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.