महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी नेमकी कशी केली जाईल, याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.25 सप्टेंबरला सुनावणीच्या पहिल्या दिवशी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं केलेल्या सूचना आणि सुनावणीचं वेळापत्रक काय असावं यावर आपला युक्तिवाद सादर केला.
त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने आता वेळापत्रक जाहीर केले आहे.
विधानसभेत अशी होईल सुनावणी
ही संपूर्ण सुनावणी या वेळापत्रकानुसारच होणार आहे. काही विशेष अडचण किंवा कुणी सुनावणी तहकुबीचा अर्ज दिल्याचा अपवाद वगळता या वेळापत्रकात शक्यतोवर बदल होणार नाहीत.
तारखांमध्ये काही बदल झाल्यास तसे वकिलांना कळवले जाईल असे विधानसभा सचिवालयाने विधानसभा अध्यक्षांच्या सहीने जाहीर कळवले आहे.
6 ऑक्टोबर 2023
याचिकाकर्ते उद्धव ठाकरे गटातर्फे 23 सप्टेंबर रोजी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं, त्यावर एकनाथ शिंदे गटाचे वकील 6 ऑक्टोबरला त्यांचे म्हणणे मांडतील.
13 ऑक्टोबर 2023
अपात्रतेबाबतच्या सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी या उद्धव ठाकरे गटाच्या मागणीवर तसंच 23 सप्टेंबर 2023 रोजी ठाकरे गटानं केलेल्या अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्ड वर आणण्याच्या अर्जावर दोन्ही पक्षांनी आपलं लेखी मत मांडायचं आहे. दोन्ही पक्ष लिखित स्वरुपात आपलं म्हणणं मांडू शकतात.
13 ते 20 ऑक्टोबर 2023
या कालावधीत अपात्रता सुनावणी बाबत विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या अधिकृत कागदपत्रांची पाहणी केली जाईल. कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी आणि कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी देण्यात येईल.
20 ऑक्टोबर 2023
अपात्रतेबाबतच्या सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी, आणि अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याची मागणी करणाऱ्या ठाकरे गटाच्या अर्जावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय जाहीर करतील.
27 ऑक्टोबर 2023
या दिवसापर्यंत दाखल झालेल्या कागदपत्रांपैकी कोणते कागदपत्र स्वीकारायचे आणि कोणते नाकारायचे यावर दोन्ही पक्षांनी आपापले म्हणणे सादर करायचे आहे. यादिवशी केवळ लेखी म्हणणे सादर करण्याची कार्यालयीन प्रक्रिया होईल.
6 नोव्हेंबर 2023
अपात्रतेबाबत निर्णय घेतांना कोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजेत यावर दोन्ही पक्षांनी आपले लेखी म्हणणे सादर करायचे आहे आणि एकमेकांना त्याच्या प्रती द्यायच्या आहेत.
10 नोव्हेंबर 2023
विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील आणि अपात्रतेबाबत निर्णय घेतांना काय मुद्दे विचारात घ्यायचे, हे निश्चित करतील.
20 नोव्हेंबर 2023
प्राथमिक तपासणी (examination in chief) घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी त्यांच्या साक्षीदारांची यादी व प्रतिज्ञापत्र या दिवशी सादर करायचे आहेत.
23 नोव्हेंबर 2023
या तारखेपासून उलट-तपासणी (cross examination) सुरू होईल. आवश्यकतेनुसार तसेच दोन्ही पक्षांच्या वकिलांच्या सोयीनुसार तारखा देण्यात येतील. शक्य असेल त्याप्रमाणे उलट-तपासणी आठवड्यातून दोनदा तरी केली जाईल.
अंतिम निर्णय कधी येईल?
सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेणं, पुरावे, उलटतपासणी अशी सगळी प्रक्रिया संपल्यावर दोन आठवड्यांनी अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवली जाईल.
म्हणजे 23 नोव्हेंबरनंतर किमान 2 आठवडे या प्रकरणावर निकाल लागणं शक्य नाही. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनामुळे विलंब झाला, तर या सुनावणीचा निकाल लागण्यासाठी जानेवारी 2024 उजाडू शकतं.
बीबीसी प्रतिनिधी दीपाली जगताप यांचं विश्लेषण
23 नोव्हेंबर सुनावणीचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर अंतिम निर्णय येईल असं वेळापत्रकात म्हटलं आहे. परंतु डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे. यामुळे या प्रकरणाचा निर्णय पुढल्या वर्षीच स्पष्ट होईल याची शक्यता अधिक आगे. म्हणजेच जानेवारी 2024 आमदारांच्या अपात्रतेचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या प्रकरणात युक्तीवादाची गरजच नाही असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. ही केस 'ओपन अँड शट' असल्याचं ठाकरे गटाचे आमदार अनील परब यांनी म्हटलं होतं. शिवसेनेत बंड झाल्याचा सर्व घटनाक्रम उघड असल्याने पुरावे सादरकरण्याची आणि उलट तपासणीचाही आवश्यकता नसल्याची ठाकरे गटाची भूमिका आहे. परंतु तरीही अध्यक्षांनी वेळापत्रकात पुरावे, साक्षीदार आणि उलट तपासणी अशीच प्रक्रिया पार पडेल असं स्पष्ट केलंय.
तसंच सर्व 34 याचिका एकत्रित कराव्यात अशी ठाकरे गटाची मागणी आहे. तसे निवेदन त्यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं आहे. याबाबत 13 आॅक्टोबरला निर्णय होणार आहे. दुसरीकडे शिंदे गटाने मात्र सर्व याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी अशी मागणी केलीय.
Published By- Priya Dixit