शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 31 डिसेंबर 2022 (20:42 IST)

त्र्यंबकेश्वर मंदिर 7 दिवस बंद राहणार

Trimbakeshwar Mandir
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ७ दिवस बंद राहणार आहे. अतिप्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 
मंदिर प्रशासनाने दिलेल्या अधिक माहितीनुसार दि. ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. त्यासोबतच मंदिराचे जे काही संवर्धनचे काम होणार आहे ते भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे, असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व भाविकांनी हितचिंतकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे अहवाहन श्री त्रिंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.
 
त्रंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची बातमी काही दिवसांआधीच समोर आली होती. त्यामुळेच उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला असावा अशी शक्यता आहे. शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघून चालला आहे. विशेष म्हणजे हा वज्रलेप करून केवळ आठ वर्ष पूर्ण झाली आहे. तरी देखील शिवलिंगाची झीज होत असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. त्याच अनुषंगाने त्रंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराची देखभाल करण्यासाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor