शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (21:35 IST)

उद्धव ठाकरेंनी अद्याप आमदारकीचा राजीनामाच दिला नाही; हे आहे कारण…

uddhav thackeray
मुख्यमंत्रीपदासोबतच विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी निरोपाच्या भाषणात केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून राजीनामा सादर केला. मात्र, उद्धव यांनी केवळ मुख्यमंत्रीपदाचाच राजीनामा दिली असून अद्यापही ते आमदार असल्याचे पुढे आले आहे. उद्धव यांनी घोषणा करुनही आमदारकीचा राजीनामा का नाही दिला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
 
सुमारे अडीच वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेवरून मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू असतानाच अखेर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्री पदाची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवली होती. वास्तविक उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे निवडणूक देखील लढविली नव्हती. त्यामुळे ते आमदार ही नव्हते तरी मुख्यमंत्री बनले. त्यामुळे कायद्यानुसार किंवा राज्यघटनेनुसार त्यांना सहा महिन्याच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून येणे आवश्यक होते, त्या नियमानुसार ते निवडून देखील आले.
 
अचानकपणे एके दिवशी शिवसेनेच्या सुमारे ४० आमदारांनी तत्कालीन मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड पुकारत शिवसेना पक्षातच मोठी फूट पाडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा सत्तांतर नाट्य घडले. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला इतकेच नव्हे तर विधानपरिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचे घोषणा केली होती, मात्र त्यांनी खरंच आमदारकीचा राजीनामा दिला की नाही हे अद्यापही याबाबत आद्यापही उलट सुलट चर्चा सुरू आहे नेमके अशी चर्चा का सुरू झाली?
 
मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी राजीनामा दिला. मात्र, त्यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. कारण, विधीमंडळाच्या वेबसाईटवर अजूनही त्यांचे नाव आमदार म्हणून दिसत आहे, शिवसेनेच्या विधान परिषदेतील १२ आमदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख आहे. गेल्या महिन्यातील म्हणजेच ८ जुलैची ही यादी आहे. विधान परिषद आमदारांचा राजीनामा सभापतींकडे दिला जातो. मात्र, सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजीच संपुष्टात आला आहे. तर उपसभापतीपदी सध्या शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे या आहेत. त्यांच्याकडेही उद्धव यांनी राजीनामा दिलेला नाही.
 
उद्धव यांनी आमदारकी न सोडण्याचे कारण म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडेच राहावे, या हेतूनेच अद्यापही त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे समजते. विधान परिषदेतील  संख्याबळ बघितले तर शिवसेनेकडे एकूण १२ सदस्य आहेत. त्यामुळे जोपर्यंत यातील ८ आमदार बंड करत नाहीत, तोपर्यंत येथे संवैधानिकदृष्ट्या वेगळ्या गटाला मान्यता मिळणार नाही. सध्या ८ आमदार शिंदे गटात जातील असे चित्र नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला देण्यात आलं आहे. त्यामुळे, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना आणि काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे. यामुळे आता पुढे अनेक राजकीय गोष्टी घडण्याची शक्यता आहे.