बुधवार, 10 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (08:42 IST)

१० ऑक्टोबरची यूपीएससी परीक्षा देता येणार आता नाशिकमधून

UPSC exam of 10th October can now be given from Nashik Maharashtra News Regional News In Marathi Webdunia Marathi
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेले केंद्रीय लोकसेवा आयोगाचे परीक्षा (यूपीएससी) केंद्र अखेर नाशिकमध्ये सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. १० ऑक्टोबरला १२ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. ४ हजार ४०० विद्यार्थ्यांनी नाशिक केंद्राची निवड केली असून, आता त्यांना नाशिकमधूनच परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देत आयोगाने ऐन कोरोनाकाळात मोठा दिलासा दिला आहे.
 
दरम्यान, परीक्षा आयोजनाबाबत प्रशिक्षण संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यासोबतच नाशिकची स्थितीही आयोगाचे उपसचिव एस. के. गुप्ता यांनी जाणून घेतली. नाशिक जिल्ह्यात दोन राज्यस्तरीय विद्यापीठे, एका विद्यापीठाचा कॅम्पस अन् खासगी विद्यापीठासह मोठ्या प्रमाणावर नामांकित शिक्षण संस्था असतानाही केंद्रस्तरावरील परीक्षा घेण्याची व्यवस्थाच नव्हती.
 
त्यामुळे विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरात जावे लागत होते. याचीच दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून नाशिकमध्ये प्रथम प्राध्यापकपदासाठी अत्यावश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे (नेट) केंद्र दोन वर्षांपूर्वीच सुरू झाले.
 
त्यानंतर लागलीच यूपीएससीचे केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले. अखेर त्याची पूर्तीही होत नाशिकला केंद्रही मिळाले.केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून १० ऑक्टोबरला ही सिव्हिल सर्व्हिस पूर्वपरीक्षा होणार आहे.दरम्यान, परीक्षेसाठी दिव्यांग परीक्षार्थींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याबद्दलचे निर्देश आयोगाचे उपसचिव एस. के.गुप्ता यांनी दिले आहेत.आयोगाकडून दर्शविण्यात आलेल्या अपेक्षांबद्दल जिल्हाधिकारी मांढरे यांनी यंत्रणा सज्ज असल्याबद्दलची ग्वाही दिली.प्रशिक्षणासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून गुप्ता यांच्यासोबत अवर सचिव दीपक पंत, उज्ज्वलकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे,उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी आणि प्रशिक्षणासाठी निश्चित करण्यात आलेल्या १२ केंद्रांचे प्राध्यापक हजर होते.