गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 28 जुलै 2024 (11:22 IST)

‘सैराटसारखं जीवे मारून टाकू अशा धमक्या आम्हाला येत होत्या, शेवटी त्यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेतलाच’

murder
माझा नवरा माझा हात धरून पाणी-पाणी करत माझ्यासमोर मेला. माझा जीव तुटत होता त्या टायमाला..”
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ज्या हातावरच्या मेंदी रंगली होती, त्याच हातांनी अश्रूंचा बांध अडवत नवविवाहित विद्या साळुंके तिच्या वेदना मांडत होती.
 
छत्रपती संभाजीनगरच्या इंदिरा नगर परिसरात घर असलेल्या साळुंके कुटुंबीयांच्या घरी त्यावेळी विद्या आणि कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी जमलेले इतर नातेवाईकही होते.
हत्येनंतर 26 जुलैला अमित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर घराबाहर टाकलेला मंडपही तसाच होता.
विद्या कीर्तिशाही आणि अमित साळुंके यांनी नुकताच 2 मे रोजी प्रेमविवाह केला होता. त्यातूनच अमित यांची हत्या झाली.
"आमच्या लग्नाला माझ्या आई-वडिलांचा, चुलत भावांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं होत की ते वेगळ्या जातीचे आहेत. त्यांची जात आपल्यासारखी नाही. त्याच्यामुळे त्यांचा विरोध होता.”
 
असं विद्या यांनी त्यांच्या कुटुंबीयांकडून दोघांच्या लग्नाला असलेल्या विरोधाबाबत आमच्याशी बोलताना सांगितलं.विद्या या नवबौद्ध समाजातील तर अमित गोंधळी समाजातून येतात.
घरच्यांच्या विरोधानंतर दोघांनी पुण्यातील आळंदीमध्ये जाऊन लग्न केलं. महिनाभर ते दोघं पुण्यात राहिले. तेव्हाही त्यांना धमक्या येत होत्या.
 
“आम्हाला धमक्या येत होत्या की, तुम्ही इकडे-तिकडे दिसला तर तुम्हाला दोघांनाही जागेवर सैराट सारखं जीवे मारून टाकू. त्यामुळं, आम्ही दूर आहोत, तिकडे आम्हाला काही झालं तर कुणाला काही कळणार नाही म्हणून आम्ही इकडे आलो,” असं विद्या सांगत होत्या.
14 जुलैचा दिवस
प्रेमविवाह केल्यानंतर अमित आणि विद्या महिनाभरानं संभाजीनगरला परत आले. त्यानंतर अमितच्या कुटुंबीयांनी त्यांचा निर्णय मान्य केला.
घरी परत आल्यानंतर साळुंके कुटुंबीयांनी अमित आणि विद्या यांचं पुन्हा विधिवत लग्नही लावून दिलं.
 
त्यानंतर काही दिवस सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण 14 जुलै रोजी अमित घरी असताना त्यांना मित्राचा फोन आला, आणि त्यानंतर सगळं काही बदलून गेलं.
विद्या सांगतात, “अमित यांच्या मित्रानं त्यांना ऑनलाईन गेम खेळायला झाडाखाली बोलावून घेतलं होतं. ते झाडाखाली गेले आणि मग लाईट गेली. त्यांनी लाईटसुद्धा घालवली. त्यानंतर अप्पासाहेब कीर्तिशाही मागून आला आणि त्यानं अमित यांच्या पोटात चाकू खुपसला. त्यांच्यावर टोटल 8 वार केले. ते खाली पडले तरीसुद्धा तो त्यांच्यावर वार करीत होता.
 
“माझा नवरा रक्तामध्ये खाली पडला होता. त्यांचे आतडे बाहेर आलेले होते. आम्ही त्यांचे आतडे धरून त्यांना सरकारी दवाखान्यात अॅडमिट केलं,” असं विद्या सांगतात.
अमित यांच्या घरापासून काही पावलं चालत गेलं की, घटना घडलेलं पिंपळाचं झाड दिसतं.
 
अमित यांच्यावर 12 दिवस शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर उपाचारादरम्यान 25 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.
 
आम्ही घरात शिरताच अमित यांचे वडील मुरलीधर साळुंके यांनी हंबरडा फोडला. मुलाला झालेल्या यातना सांगायला त्यांच्या आवाजात थरकाप जाणवत होता.
 
ते म्हणाले, “आम्ही रीतीरिवाजाने लग्न करून दिलं. त्याच्यानंतर फक्त 1 महिना झाला. तो इथं आला आणि त्याचा घात केला.”
 
अमितनं बारावीनंतर बीएससी केल्याचं ते सांगत होते.
 
पोलीस तपास सुरू
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
 
पोलीस उपायुक्त नवनीत कावंत यांनी सांगितलं की, “याप्रकरणी 14 जुलै रोजी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झालेला होता. यातील मुलाचा मृत्यू झाल्यामुळे आम्ही हत्येची कलमं समाविष्ट केली आहे. यामागे दोन आरोपी आहेत आणि त्यांच्या शोधात आमच्या दोन टीम कार्यरत आहेत.”
कावंत पुढे म्हणाले, “या प्रकरणातील तरुण आणि तरुणीनं आंतरजातीय लग्न केलेलं होतं. आंतरजातीय लग्नानंतर त्यांच्यात कौटुंबिक मतभेद काय होते, इथपर्यंत आमचा तपास पोहचलेला नाही. पण, यामुळेच तरुणावर चाकूचा वार करुन हत्या करण्यात आली आहे.”
 
‘...तर कुणीही प्रेमविवाहाची हिम्मत करणार नाही’
अमितच्या आई छाया साळुंके म्हणाल्या, “सरकारनं आम्हाला साथ नाही दिली, तर आम्ही कुणाकडे तक्रार करायची. कुणाकडं न्याय मागायचा. आमचा एवढा मोठा जीव गेला. माझा पोटचा गोळा गेला. आज माझ्यावर काय बितली असेल ते तुम्ही समजू शकता.”
 
प्रेमविवाहाचा कायदा लागू आहे. लग्न करण्याचा ज्याचा त्याचा अधिकार आहे. लोकांनी जर हा अधिकारच हिसकावून घेतला तर सरकार काय कामाचं आहे?, असा सवाल छाया यांनी केला.
या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी साळुंके कुटुंबीयांची मागणी आहे.
 
“त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. कारण इतकं सगळं करून ते मोकाट फिरतील तर काय अर्थ आहे ह्या गोष्टीला? शेवटी माझ्या नवऱ्याचा जीव गेलाय. आरोपी मोकाट फिरले तर नंतर कुणीही प्रेमविवाह करण्याची हिम्मत करणार नाही,” असं विद्या त्यांची भावना मांडताना म्हणाल्या.
 
सेफहोमचा पर्याय?
आंतरजातीय विवाह करणाऱ्या आणि ऑनर किलिंगची भीती वाटणार्‍या जोडप्यांच्या मोफत राहण्यासाठी पोलीस आवारात सेम हेम उभारावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं (अंनिस) सरकारकडे केली होती.
 
अंनिसचे जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे याविषयी सांगतात, “सरकार लवकरच असे सेफहोम उभारणार आहे. सहा महिन्यांपर्यंत जोडप्यास अत्यल्प दरात निवासाची व जेवणाची सोय होईल. नातेवाईकांचे त्यात समुपदेशन होईल. यामुळे ऑनर किलिंग कमी होतील, असा विश्‍वास आहे.”
संभाजीनगर येथे नवबौद्ध समाजातील मुलीने गोंधळी समाजातील मुलाशी प्रेमविवाह केला. त्याचा राग येऊन मुलीच्या नातेवाईकांनी मुलाचा खून केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीअंतासाठी आंतरजातीय विवाह हा उपाय सांगितला आहे. पण समाज विपरीत वागत आहे,” चांदगुडे पुढे सांगतात.
 
ऑनर किलिंगमागे जातीचं भूत
संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील गोयेगावमध्ये खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावानेच तरुणीचं शीर धडावेगळं करत तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला होता.
 
2021 मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी 2024 च्या मे महिन्यात आई आणि भावाला वैजापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
ऑनर किलिंगमागील मानसिकतेविषयी विचारल्यावर छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा सांगतात, “जात आपल्या मनात घर करुन आहे. ऑनर किलिंग जातीय विद्वेषातून होतात. जातीधर्माच्या पलीकडं माणूस म्हणून आपण विचार करत नाही. प्रेम करा असं म्हटलं जातं पण ते कुणावरही केलेलं चालत नाही, ते जातीतल्याच माणसावर केलेलं पाहिजे. अशी आपली मानसिकता आहे.”
पण, हे रोखण्यासाठी काय करायला पाहिजे, या प्रश्नावर खिवंसरा सांगतात, "कायदे कडक आहे पण लोकांना भीती वाटत नाही. कारण एखादी घटना घडली की तिचा निकाल लगेच येत नाही. तोपर्यंत दुसरी घटना घडते आणि लोक पहिली घटना विसरतात.
 
"ऑनर किलिंगसारख्या गुन्ह्यांमध्ये आरोपींना तत्काळ शिक्षा झाल्यास समाजात एक मेसेज जाईल की असं केल्यास कठोर शिक्षा होते. यातून माणूस असं कृत्य करण्यास धजावणार नाही."
Published By- Priya Dixit