1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अलिबाग , सोमवार, 4 सप्टेंबर 2023 (07:51 IST)

आंबेत पूल खुला होणार कधी ; आंबेत, म्हाप्रळसह मंडणगड, दापोलीकरांचे लागले लक्ष

ambet bridge
तब्बल 12 कोटी रुपये खर्च करून आंबेत पूल अवघ्या आठच महिन्यात पुन्हा दुरुस्तीस आल्याने पुन्हा दुरुस्तीसाठी 16 कोटी रुपये मंजूर करावे लागले. तरीसुद्धा गेल्या 3 वर्षात पुलाची दुरुस्ती काही पूर्ण होईना म्हणून फेरीबोटीतून वाहतूक करण्याची नामुष्की प्रशासनावर आली. कामाची सद्यस्थिती पाहिली तर गणेशोत्सवापूर्वी या पूलावरून वाहतूक सुरू होईल, हा प्रशासनाचा दावा फोल ठरण्याची शक्यता आहे.
 
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आणि रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील आंबेत या दोन गावांना जोडणार्‍या सावित्री खाडीवरील आंबेत पुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे आंबेत पुलावरून वाहतूक थांबली. या खाडीत दळणवळणासाठी फेरीबोट ठेवण्यात आली आहे. सुरवातीला वाहनासाठी भाडे आकारले जायचे. त्यानंतर मोफत सेवा देण्याचे ठरले. गेली कित्येक तीन वर्षे या सावित्री खाडीतून फेरीबोटीमधून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
 
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्हयाना जोडणारा हा पूल बॅ. ए. आर. अंतुले यांच्या कारकीर्दीत 1978 साली उभा राहिला. या पुलामुळे रत्नागिरीतील मंडणगड, दापोली आणि खेड या तालुक्यांसाठी मोठा फायदा झाला. रायगड रत्नागिरी या दोन जिल्हयातील दळणवळण सुलभ झाले. हा पूल धोकादायक झाल्याने महाविकास आघाडीच्या काळात त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यावेळी तब्बल 12 कोटी रूपये खर्च करून पूलाची दुरूस्ती करण्यात आली. गणेशोत्सवापूर्वी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हा पूल पुन्हा वाहतूकीसाठी खुला केला. परंतु काही महिन्यातच पूल पुन्हा वाहतूकीस धोकादायक बनल्याचे लक्षात आल्याने पुन्हा एकदा या पूलावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 
पूलावरून वाहतूक बंद असल्याने या ठिकाणी फेरीबोटीच्या मदतीने प्रवासी आणि वाहनांची वाहतूक केली जाते. दुसरीकडे अनेक प्रवासी वळसा घालून महाडमार्गे प्रवास करणे पसंत करतात. पूल वाहतूकीसाठी बंद असल्याने शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात येईल असा दावा बांधकाम विभागातर्फे करण्यात आला होता. परंतु कामाचा वेग आणि त्यात येणारे नैसर्गिक अडथळे पाहता या पूलावरून गणपतीपूर्वी पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करणे शक्य होईल असे दिसत नाही. तसे झाल्यास यंदा गणेशोत्सवासाठी गावी येणारया चाकरमान्यांची रखडपटटी होण्याची शक्यता आहे.
नेमकं झालंय तरी काय ?
 
या पूलाच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. सावित्री खाडीत मोठया प्रमाणावर वाळूचे उत्खनन केले जाते. त्यामुळे पूलाला धोका निर्माण झाला आहे. पूलाच्या पाचव्या क्रमांकाच्या खांबाच्या वेल फाऊंडेशनला साडेअठरा मीटर व साडेचार मीटरवर असे दोन तडे गेले आहेत. आता दोन बाजूला प्रत्येकी 4 पाईल फाऊंडेशन करून त्यावर पाईल कॅप करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर पियर आणि त्यावर पुलाचे दोन्ही बाजूचे गर्डर ठेवण्यात येतील. बांधकाम विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पुढील दोन चार दिवसात स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण होईल. गणेशोत्सवापूर्वी हा पूल हलक्या वाहनांना वाहतूकीसाठी खुला करण्यास योग्य होईल, असा दावा करण्यात येत आहे.