बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (08:24 IST)

गाडी शिकताना ब्रेकऐवजी एक्सलरेटरवर पडला पाय, माय-लेकींनी गमावला जीव

satara accident
गाडी शिकत असताना एका महिलेचा ब्रेकऐवजी चुकून एक्सलरेटवर पाय पडल्यानं गाडी थेट विहिरीत पडल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यात घडला आहे. या महिलेला तिचे पती गाडी शिकवत होते.
 
गाडीत यावेळी दाम्पत्यासोबत त्यांची मुलगीही होती.
 
या अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला असून, पतीवर दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती देऊळगाव राजाचे पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे.
 
महिला आणि मुलीचा मृतदेह काढताना विहिरीत उडी घेतलेला युवक ही पाण्यात बुडाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे. विहिरीत उडी मारणाऱ्या या युवकाचं नाव पवन पिंपळे असं आहे.
 
या घटनेतील तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
 
नेमकं घडलं काय?
अमोल मुरकुट हे जाफराबाद तालुक्यातील नळणी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. देऊळगाव राजा शहरातील रामनगर येथे वास्तव्याला असून कार शिकवण्यासाठी घरासमोरून निघाले.
 
त्यावेळी त्यांची पत्नी कार चालवत होती आणि मुलगी समोर व शिक्षक अमोल मुरकुट मागे बसलेले होते. कार सुरू करून कारसमोर आलेल्या दुचाकीला वाचवण्यासाठी महिलेनं ब्रेकऐवजी एक्सलरेटर दाबल्यानं सुसाट वेगानं घराजवळ असलेल्या विहिरीत कार कोसळली.
 
ही विहीर 60 फूट खोल आहे.
 
कारचे दार उघडून शिक्षक पाण्याबाहेर आले असता नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. त्यांच्या हाताला मार लागल्यानं ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय.
 
देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अस्मा शेख यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "या घटनेतील पुरुषाच्या हाताला थोडासा मार लागला होता. त्यांना डिस्चार्च करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत आता स्थिर आहे. मृत महिला आणि मुलीचा मृतदेह जवळपास 8 तासांनंतर बाहेर काढण्यात आला आहे. त्यांच्या मृतदेहांवर आता पोस्टमोर्टम करण्यात येणार आहे. यासोबत त्यांना वाचवायला विहीरीत उडी मारलेल्या तरुणाचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे."
 
वाचवण्यासाठी विहीरीत मारली उडी पण...
विहिरीजवळ उभ्या असलेल्या गर्दीतून शहरातील पवन तोताराम पिंपळे या 22 वर्षांच्या युवकाने कपडे काढून विहिरीत उडी घेतली. पण त्यानंतर तो खूप वेळ बाहेर आला नाही. तोही पाण्यात बुडाला.
 
या घटनेतील तिन्ही मृतदेह आता बाहेर काढण्यात आलं आहे.
 
नातेवाईकांचा टाहो
ही घटना माहिती मिळताच स्वाती यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी एकच टाहो फोडला.