मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (16:00 IST)

'स्वतःच्या वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? हळूहळू सगळं बाहेर काढू'

"आम्हालाही बरंच काही माहिती आहे. स्वतःच्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं होतं," असा सवाल करत नारायण राणे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.
 
त्यावर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिलंय. त्यांनी चिंटू शेख गोळीबार आणि अंकुश राणे हत्या प्रकरणाचा उल्लेख करत राणेंना सवाल केले आहेत.
 
नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला पुन्हा एकदा सुरुवात झालीय. त्यावेळी रत्नागिरीत बोलताना राणे यांनी टीका करताना शिवसेनेची जुनी प्रकरणं बाहेर काढण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचं नाव मात्र घेतलेलं नाही.
 
या सर्वानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष अधिक पेटत जाणार असल्याची चिन्हं आहेत. राणेंची टीका आणि त्यानंतर त्यांच्या अटक प्रकरण ताजं असतानाच नारायण राणेंनी नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत.
 
दरोडेखोराप्रमाणे अटक केली
"एखाद्या दरोडेखोराला अटक करतात तशी केंद्रीय मंत्र्याला अटक करण्यात आली. दोनशे-अडीचशे पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली. काय पराक्रम आहे," अशा शब्दांत नारायण राणे यांनी उपहासात्मक टीका केली.
 
महाराष्ट्रातील जनता सध्या अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, पूर परिस्थिती कोणालाही मदत मिळाली नसल्याचा आरोप राणे यांनी सरकारवर केला.
 
"जुन्या गोष्टी काढणार असं म्हटले होते. दोन वर्षं झाली शोध घेत आहेत. पण त्यांना काही मिळालं नाही. पण आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय? जया जाधव यांची हत्या झाली. त्याचं कारण काय? अशी प्रकरणं आम्हालाही माहिती आहेत," असं नारायण राणे म्हणालेत.
 
वहिणीवर अॅसिड हल्ला कोणी केला?
पुढं बोलताना राणे यांनी नाव न घेता गंभीर आरोप केला. "आपल्या भावाच्या पत्नीवर म्हणजे वहिणीवर अॅसिड फेकायला कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं," हेही माहिती असल्याचं राणे म्हणाले. राणे यांनी अशाप्रकारे टीका करताना संस्कारच तसे असल्याची टीकाही केली. तसंच अशी अनेक प्रकरणं माहिती आहेत ती टप्प्या टपप्यानं बाहेर काढणार आहे, असं राणे म्हणाले. सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियन यांच्या केस संपलेल्या नाहीत मी केंद्रामध्ये मंत्री आहे, याची जरा आठवण ठेवा असंही ते म्हणाले.
 
"रिस्ट्रिक्शन किती दिवस ठेवणार. आम्हालाही तोच कायदा आहे. त्यामुळे दादागिरी करू नका तो तुमचा पिंड नाही. तुम्ही आम्हाला जवळून पाहिलं आहे," असा धमकीवजा इशाराच राणेंनी दिला.
 
माझ्याकडेही भरपूर मसाला
"नारायण राणेला धमक्या देण्याचा प्रयत्न नका करू. मी एक-दोन नव्हे तर 39 वर्षं सोबत होतो. माझ्याकडंही तुमच्याबाबत पुष्कळ मसाला आहे," असं नारायण राणे म्हणालेत.
 
आमच्या घरासमोर वरून सरदेसाई येतो आणि हल्ला करतो त्याला अटक झाली नाही. पण तो आता परत आला तर परत जाणार नाही, असंही नारायण राणे म्हणाले. सध्या माझा आवाज बसला आहे. पुन्हा माझा आवाज खणखणीत झाल्यानंतर मी खणखणीत वाजणार असंही राणे यावेळी म्हणाले.
 
'शिवसेना संपवा, औषधालाही सापडायला नको'
नव्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर पंतप्रधानांनी आम्हाला तुमच्या भागात जाऊन जनतेचे आशीर्वाद घेऊन काम सुरू करा, असं सांगितलं. त्यामुळे ही जन आशीर्वाद यात्रा काढली असल्याचं राणेंनी म्हटलं.
 
या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रात्री एक-एक वाजेपर्यंत हजारो लोक रस्त्यावर आम्हाला भेटण्यासाठी उभे होते. हे सुख यांच्या नशिबी येऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
 
दोन वर्षांमध्ये कोकणातील शेतकऱ्यांना यांनी काहीही दिलं नाही. केंद्रात माझ्याकडं असलेल्या खात्याच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं राणे यावेळी म्हणाले.
 
आगामी निवडणुकीत सगळे आमदार खासदार आपले हवेत. शिवसेना औषधाला मिळणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन नारायण राणेंनी उपस्थितांना केलं.
 
फडणवीसांनी काढलेली राणेंची कुंडली वाचा - राऊत
नारायण राणे यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या फडणवीस यांनीच राणेंची कुंडली मांडली होती. तिचा अभ्यास करण्याची विनंती सरकारला करणार असल्याचं राऊत नवी दिल्लीत एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय.
 
"ज्यावेळी राणे इतरांवर आरोप करतात तेव्हा अंकुश राणे सारख्या सख्ख्या चुलत भावाची हत्या कोणी केली? कुठं केली? हत्या करून कोणत्या गाडीत टाकलं? याची कधी चौकशी केली का," असा सवाल विनायक राऊत यांनी केलाय.
 
राऊत यांनी राणेंच्या मुलाबाबतही गंभीर आरोप केलेत. "तुमच्या मुलानं चिंटू शेखला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन गोळ्या घातल्या त्याची कधी विचारपूस केली का? स्वतःचं सर्व माफ आणि दुसऱ्याचं उकरून काढायचं," असं विनायक राऊत म्हणालेत.
 
"आम्हाला राणेंचे काय धंदे काढतात हे उकरून काढायचं नाही. आम्ही फक्त महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना एकच विनंती करणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत नारायण राणे यांची कुंडली वाचून दाखवली होती. तिचा अभ्यास करावा," अशी विनंती करणार असल्याचं विनायक राऊत म्हणालेत.