राजकीय वर्तुळात खळबळ: शरद पवारांची राष्ट्रवादी मोठ्या पक्षात विलीन होणार?
महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आपला पक्ष कोणत्या पक्षात विलीन करावा, या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह समोर आले आहेत.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षांची ताकद वाढवण्यासाठी काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्वतःच्या पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव दिला होता. सुरुवातीला राष्ट्रवादीकडून यावर सकारात्मक विचार केला जात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, गेल्या २० दिवसांत पक्षांतर्गत समीकरणे बदलली असून आमदारांमध्ये दोन गट पडल्याचे समजते.
पहिली भूमिका: आमदारांच्या एका गटाचे म्हणणे आहे की, पक्षाने अधिकृतपणे काँग्रेसमध्ये विलीन व्हावे.
दुसरी भूमिका: तर दुसऱ्या बाजूला काही आमदारांचा कल थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील होण्याकडे आहे. मतदारसंघात विकासकामे करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे या आमदारांनी ही भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही.
दरम्यान, अशाच प्रकारचा विलीनीकरणाचा प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनाही देण्यात आल्याची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांनीही काही दिवसांपूर्वी विरोधकांनी काँग्रेसच्या छत्राखाली एकत्र येण्याबाबत विधान केले होते. आता आमदारांमधील या दोन परस्परविरोधी मतांमुळे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि शरद पवार काय अंतिम निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
