मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (15:18 IST)

ब्रेक-अपचा फायदाही असतो का? ब्रेक-अपमुळे काय शिकायला मिळतं?

breakup heart
तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न आहे, नातं तुटल्यावर कोणाला बरं वाटतं? आणि फायद्याचं विचाराल तर कदाचित आपण त्याचा विचारही केला नसेल.
 
'द ब्रेक-अप मोनोलॉग्स' या पुस्तकाच्या लेखिका रोझी विल्बी यांच्या मते, नातं तोडण्याचे अनेक फायदे असतात.
 
रोझी विल्बी या पूर्वी त्यांच्याच नावाने एक पॉडकास्ट सादर करायच्या. पुढे त्यांनी याच नावाने एक पुस्तक लिहिलं.
 
या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली आहे. याशिवाय पॉडकास्टवर आलेल्या पाहुण्यांसोबतच्या संवादादरम्यान त्यांना मानवी नातेसंबंधांबद्दल जे काही समजलं, ते त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
 
हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी अनेक थेरपिस्ट, समाजशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी बीबीसी रील्स सोबत आपल्या पुस्तकाविषयी चर्चा केली.
 
बीबीसी रील्सशी बोलताना रोझी विल्बी म्हणतात की, 'आपलं हृदय तुटल्यावर आपण बरंच काही शिकतो. बीबीसीसोबत आपला अनुभव शेअर करताना त्या सांगतात, ब्रेकअपला कधीच चांगलं मानलं जात नाही. पण कधीकधी यामुळे आपलं थोडंफार चांगलं देखील होतं.'
 
स्वतःला समजून घेण्याची संधी
रोझी विल्बी यांच्या म्हणण्यानुसार, ब्रेक-अपमुळे आपल्याला कशी व्यक्ती हवीय यावर आणि आपल्या नात्यावर पुन्हा विचार करण्याची संधी मिळते. आणि कधीकधी तर नुसत्या ब्रेकअपच्या वेदनादायी अनुभवातूनच आपल्याला स्वतःबद्दल समजू लागतं आणि योग्य निर्णय घेण्यास आपण सक्षम होतो.
 
मानसिक आरोग्य आणि वर्तणूक शास्त्रातील तज्ञ डॉ. समीर मल्होत्रा यांचा असा विश्वास आहे की बऱ्याचदा नातं तुटलं की आपले डोळे उघडतात.
 
बीबीसीच्या सहकारी फातिमा फरहीन यांच्याशी बोलताना डॉ. मल्होत्रा म्हणतात, "ब्रेकअपमुळे तुम्हाला तुमच्यात असणाऱ्या उणिवांची जाणीव होते. मग तुम्ही स्वतःमध्ये बदल करता. तुम्ही ब्रेकअपकडे कसे बघता हे तुमच्यावर अवलंबून असतं. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये चुका शोधत राहिलात तर तुम्ही स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणार नाही."
 
प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात
दिल्लीस्थित मानसशास्त्रज्ञ आणि विवाह समुपदेशक शिवानी मिश्री साधू सांगतात की, ब्रेकअपचा काळ प्रत्येकासाठी कठीण असतो आणि यातून बाहेर पडण्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.
 
फातिमा फरहीनशी बोलताना शिवानी मिश्री साधू सांगतात की, कधी कधी नातं तुटणं हा देखील आपल्यासाठी धडा असतो.
 
त्या सांगतात, "जेव्हा तुमचा ब्रेकअप होतो, तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल जाणून घेण्याची आणि स्वतःला सुधारण्याची संधी मिळते. या नात्यात आपण काय चूक केली हे देखील आपण स्वीकारलं पाहिजे."
 
ब्रेकअप आणि व्यसन
रोझी विल्बी ब्रेकअपची तुलना व्यसनाशी करतात.
 
त्यांच्या मते, नातं तुटल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं वर्तन व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीसारखं होतं. म्हणजे जर एखादा व्यक्ती नशा करत असेल आणि त्यापासून त्याला रोखलं तर जशी अवस्था त्या व्यक्तीची होते तशीच अवस्था ब्रेकअप झालेल्या व्यक्तीची होते.
 
डॉ. समीर मल्होत्रा सांगतात की, जेव्हा मेंदूमध्ये लव्ह केमिकल म्हणजेच ऑक्सिटोसिन हार्मोन वाढते तेव्हा समोरच्या व्यक्तीविषयी आकर्षण वाढते. कोणत्याही प्रकारच्या प्रेमात असं वागणं दिसून येतं.
 
ते म्हणतात, "अनेक वेळा मेंदूमध्ये डोपामाइन सक्रिय होतं. त्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेटण्याची इच्छा वाढते. पण तसं घडलं नाही आणि तुमचं नातं तुटलं तर तुमची अवस्था व्यसनी माणसासारखी होते."
 
डॉ. समीर मल्होत्रा यांच्या मते, नशेच्या व्यसनातही डोपामाइन सक्रिय असतं.
 
ताबडतोब नवं नातं सुरू करावं का?
रोझी विल्बी सांगतात की, नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. हे एक कठीण काम आहे कारण नातेसंबंधांमुळे तुमच्या आयुष्यात खूप गोंधळ उडतो. तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीशी आणि त्याच्या चांगल्या-वाईट वागण्याशी जुळवून घ्यावं लागतं.
 
रोझी विल्बी सांगतात, "ब्रेकअपनंतर दुसर्‍या नात्यात जाण्याऐवजी स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतःबद्दल विचार करणं महत्त्वाचं आहे."
 
पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही संन्यास घ्या, शारीरिक संबंधांपासून दूर राहा.
 
स्वतः सोबतच नातं समजून घेणं गरजेचं
डॉ. समीर मल्होत्रा रोझी विल्बी यांच्या मुद्द्याशी सहमत आहेत.
 
ते म्हणतात, "अनेकदा लोकांना वाटतं की एक नातं तुटलं तर दुसरं नातं लवकर तयार व्हावं. पण हे चुकीचं आहे. आपलं सर्वात महत्वाचं नातं स्वतःशी असतं. त्यात काही नियम, काही संतुलन, काही शिस्त असावी."
 
डॉ. मल्होत्रा यांच्या मते तुमची ऊर्जा छंद जोपासण्यााठी किंवा आवडींमध्ये वापरली पाहिजे.
 
ते म्हणतात, स्वतः सोबतच नातं सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि स्वतःच्या उणिवा समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
 
डॉ. मल्होत्रा म्हणतात की, आपण उगाच कोणाच्याही मागे लागू नये. किंवा नैराश्यातून उगाच एखाद्या नात्याचा स्वीकार करू नये.
 
ते म्हणतात, "जेव्हाही आपण नातेसंबंधांबद्दल बोलतो तेव्हा त्यात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे हेल्दी कनेक्टेडनेस आणि हेल्दी डिस्टंस. सोप्या भाषेत सांगायचं तर नातेसंबंध टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एकमेकांच्या जवळ असण्यासोबतच अंतरही महत्वाचं आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी वेळ हवा असतो ज्याला आपण पर्सनल स्पेस म्हणू शकतो.
 
लोकांची बदलती मतं
शिवानी मिश्री साधू यांच्या मते, भारतातही ब्रेकअपबाबत लोकांची मते बदलू लागली आहेत.
 
तज्ञ म्हणतात की, आता लोकांना हे समजू लागलंय की टॉक्सिक नातेसंबंधात राहिल्याने त्यांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य बिघडते. मात्र, भारतातील परिस्थिती अजूनही अशी आहे की त्यातून बाहेर पडणं थोडं कठीण आहे.
 
ब्रेकअप नंतरच्या परिस्थितीबद्दल बोलताना पूजा शिवम जेटली सांगतात की, तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटू शकता, निरोगी सवयी लावू शकता, तुमचे आयुष्य नव्याने जगायला शिकू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचे स्वतःचे महत्त्व समजू लागते.
 
शिवानी मिश्री साधू म्हणतात, "तुम्ही ब्रेकअपनंतरही आनंदी राहू शकता."