1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2024 (15:09 IST)

तुमच्या दिसण्यापेक्षा तुमच्या व्यक्तिमत्वातले 'हे' पैलू समोरच्या व्यक्तीला आकर्षक वाटतात

इंग्लिश भाषेत एक म्हण आहे, “फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.”
म्हणजेच पहिल्या भेटीत तुमच्याबद्दल जी प्रतिमा समोरच्याच्या मनात तयार होते ती कायम राहाते.
तुम्ही कसे दिसता हे पहिल्या भेटीत महत्त्वाचं असलं तरी तुमच्या व्यक्तिमत्वात असे काही पैलू असतात जे लोकांना हृदयाला हात घालतात.
 
सर्वसाधारणपणे अशी मान्यता आहे की लोक एकमेकांचं दिसणं पाहून एकमेकांच्या प्रेमात पडतात.
 
पण एकमेकांसाठी वाटणारं शारीरिक आकर्षण इतर काही गुणांमुळेही असू शकतं. तुम्ही बोलता कसे, वागता कसे याही बाबी महत्त्वाच्या आहेत.
अमेरिकेत केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात जोडप्यांना विचारलं की तुम्हाला बाह्य सौंदर्य सोडून आणखी कोणते गुण आवडतात तर रंजक उत्तरं आली.
 
लोकांनी म्हटलं की पैसे, स्वतःचं घर, इतर सुखसोयी त्यांच्यासाठी इतक्या महत्त्वाच्या नव्हत्या.
 
तर आपल्या पार्टनरच्या मतांचा आदर करणं, त्यांच्या गोष्टी पटवून घेणं, लोकांमध्ये खेळीमेळीने वावरणं, बुद्धीमत्ता यासारख्या गुणांना ते शारीरिक सौंदर्यापेक्षा जास्त महत्त्व देत होते.
 
‘दिसणं’ किती महत्त्वाचं ?
अमेरिकेतल्या फ्लोरिडा विद्यापीठातले मानसशास्त्राचे प्राध्यापक ग्रेग वेबस्टर म्हणतात की, “अशा प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये लोक अशी उत्तरं देतात ज्यामुळे त्यांची प्रतिमा चांगली राहील. त्यामुळे कदाचित ते खरं बोलत असतील असं नाही. परिणामी अशा सर्वेक्षणाचे निकाल बरोबरच असतील असं नाही.”
 
खऱ्या आयुष्यात खरंच बाह्य सौंदर्यापेक्षा गुणांना महत्त्व मिळतं का?
 
बीबीबी प्रतिनिधी पायल भुयन यांच्याशी बोलताना मानसशास्त्रज्ञ डॉक्टर पूजा जेटली म्हणतात, “सुरुवातीला वाटणारं आकर्षण दिसण्यावर आधारित असतं. तुम्ही कसे दिसता हे महत्त्वाचं आहे, एखाद्या नात्यासाठी ती सुरुवात असू शकते पण दीर्घकाळासाठी फक्त सौंदर्य आकर्षित करू शकत नाही.”
 
त्यांच्या मते, “बहुतांश नात्यामध्ये जेव्हा या गोष्टींवर बोललं जात नाही तेव्हा पुढे जाऊन मतभेद होऊ शकतात. त्यामुळे आपल्या पार्टनरचं म्हणणं ऐकणं, त्यांच्या मताचा आदर करण आणि एकमेकांशी संवाद साधणं कोणत्याही नात्यासाठी तेवढंच महत्त्वाचं असतं.”
 
त्या पुढे म्हणतात की जो तुम्हाला, तुमच्या बोलण्याला महत्त्व देत नसेल अशा माणसावर कोण का भरवसा ठेवेल?
 
एखाद्याच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेणं अवघड काम आहे. अनेक दशकांपासून सायकोमेट्रिक टेस्टमध्ये अनेक प्रश्न विचारले जातात ज्यामुळे लोकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणखी माहिती मिळेल.
 
कसा अंदाज घेणार व्यक्तिमत्वाचा?
या प्रश्नावर बीबीसी प्रतिनिधी पायल भुयनशी बोलताना मानवी स्वभाव विश्लेषक आणि लाईफ कोच आस्था दीवाण म्हणतात, “एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अनेक गोष्टींनी बनतं. तुमच्याशी सहजपणे संवाद साधता येतो का ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.”
 
“तुम्ही बोलताना दुसऱ्याला बोलण्याची संधी देता का, तुमची आवडनिवड काय आहे, तुमचं आयुष्य कसं आहे, तुमच्या आयुष्यात कोणती मुल्यं महत्त्वाची आहेत, तुमचा आत्मविश्वास कसा आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.”
 
अनेकदा ‘ऑपोझिट्स अट्रॅक्ट’ हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेल. याचा अर्थ जे लोक एकमेकांपासून अगदी वेगळे, विरुद्ध स्वभावाचे असतात ते एकमेकांकडे आकर्षित होतात.
 
बीबीसी फ्युचरच्या एका लेखात अमेरिकेतल्या रॉचेस्टर विद्यापीठातले हॅरी रीड आणि मिनीसोट विद्यापीठाचे अॅलन बर्शार्ड म्हणतात की लोक नेहमी अशा प्रकारचे जीवनसाथी निवडतात ज्यांना ते आधीपासून ओळखतात, त्यांचं व्यक्तिमत्व, वागणं, खाणं-पिणं स्वतःच्या सामाजिक वर्तुळाच्या जवळ जाणारं असतं.
 
यावर आस्था दिवाण म्हणतात की, “अनेकदा लोक आपआपसात सारखेपणा शोधतात आणि अनेकदा स्वतःपेक्षा वेगळी लोकही शोधतात. माणसाची प्रवृत्ती अशी आहे की ते आपल्यासारख्या लोकांचा शोधात असतात.”
 
त्या पुढे म्हणतात, “समान असल्यामुळे त्यांना सुरक्षित वाटतं. जर तुमच्या विचारात, गुणांमध्ये, आवडीनिवडीमध्ये एकवाक्यता असली तर लगेच समोरची व्यक्ती जवळची वाटायला लागते. पण कोणत्याही नात्याला दीर्घकाळ टिकवायचं असेल तर तुम्हाला एकत्र राहून, समान आवडी जपून वेगवेगळ्या मार्गाने पुढे जाण्याचा काहीतरी मार्ग हवा.”
 
“असं नाही की दरवेळी लोक आपल्यासारखेच लोक शोधतील. कधी कधी विरुद्ध स्वभावाचेही लोकही आवडू शकतात. मुख्य अट ही की त्या दोन व्यक्ती एकमेकांसाठी पूरक असाव्यात.”
 
डॉ दिवाण म्हणतात, “आपल्यात जी कमतरता आहे ती माणूस आपल्या साथीदारामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. ते दोघं मिळून एकमेकांना पूर्ण करतात.”
 
बीबीसी फ्युचरशी बोलताना ग्रेग वेबस्टर म्हणतात की, “नात्यांमध्ये आकर्षक बाह्य सौंदर्यासह एकमेकांचं पटणं, एकमेकांना समजून घेणं हे गुण जास्त महत्त्वाचे असतात.”
 
 
ग्रेग वेबस्टरने सामाजिक मानसशास्त्रज्ञ अँजेला ब्रायन आणि अमँडा महाफ्फी यांच्यासोबत एकत्र येत मानवी व्यक्तित्वाच्या तीन गुणांवर संशोधन केलं आहे.
 
हे तीन गुण आहेत – शारीरिदृष्ट्या आकर्षक असणं, आर्थिकदृष्ट्या स्थिर असणं आणि एकमेकांशी जुळवून घेण्याचा स्वभाव असणं.
 
या संशोधनात लक्षात आलं की हे तीन गुण लोकांना आकर्षित करतात.
 
कारण प्रत्येक गुण एक तर सुरक्षितता देतो किंवा मुलभूत गरजा पूर्ण करतो.
 
आणखी एक महत्त्वाचा गुण प्रभुत्व (डॉमिन्सन). पण हा गुण चांगला आणि वाईट दोन्हीही असू शकतो.
 
वेबस्टर म्हणतात, “आपल्या जोडीदाराचं प्रभुत्व (वर्चस्व) बाह्य जगात असावं, त्यांनी सामाजिक, शारीरिक आणि आर्थिकरित्या वरचढ असावं असा विचार सगळेच करतात पण ते वर्चस्व नात्यात असावं हे त्यांना पटत नाही.”
 
“पण जर त्या व्यक्तीत वर्चस्व प्रस्थापित करण्याबरोबर दुसऱ्याशी जुळवून घेण्याचा गुणही असेल तर मग ती व्यक्ती अधिक आकर्षक वाटू लागते.”
 
वेबस्टर यांच्यामते ‘जुळवून घेणे’ हा गुण सर्वात महत्त्वाचा आहे.
 
Published By- Priya Dixit