सचिन तेंडुलकरने पालघरमध्ये ‘Climate Smart Village’ प्रकल्पाचा शुभारंभ केला
क्रिकेटमधील महान खेळाडू आणि भारतरत्न पुरस्कार विजेते सचिन तेंडुलकर यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या गुहिर गावात एका नवीन 'क्लायमेट स्मार्ट व्हिलेज' प्रकल्पाचे उद्घाटन केले. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने सुरू केलेल्या या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागात शाश्वत विकासाला चालना देणे आणि लोकांचे राहणीमान सुधारणे हा आहे. शाश्वत ऊर्जा आणि पाण्याच्या उपाययोजना पुरवून गावातील सुमारे १३० कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रामीण समुदायाला आत्मनिर्भर बनवणे आणि पारंपरिक संसाधनांवरील अवलंबित्व कमी करणे, हे फाऊंडेशनचे ध्येय आहे.
या योजनेअंतर्गत १३० घरांमध्ये सौर पॅनेल बसवण्यात आले असून, त्यांना मोफत वीजपुरवठा केला जात आहे. हे सौर पॅनेल केवळ घरगुती गरजाच पूर्ण करणार नाहीत, तर शेतीकामांसाठीही उपयुक्त ठरतील. यामुळे ग्रामीण कुटुंबांना विजेच्या खर्चातून दिलासा मिळेल आणि स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन मिळेल. याव्यतिरिक्त, गावात सौरऊर्जेवर चालणारी पिठाची गिरणीही बसवण्यात आली आहे. या सुविधेमुळे गावकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचतील, तसेच धान्य दळण्यासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही. हा उपक्रम विशेषतः महिला आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानला जातो, कारण त्यामुळे त्यांची दैनंदिन कामे सोपी होतील.
या प्रसंगी बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले की, ग्रामीण विकासासाठी शाश्वत तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामुळे भावी पिढ्यांसाठी उत्तम संसाधने सुनिश्चित होतील. ते असेही म्हणाले की, असे प्रकल्प ग्रामीण भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. गुहीर गावात या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर स्थानिक रहिवासी उत्साही आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, आता त्यांची विजेच्या समस्येतून सुटका होईल आणि अनेक दैनंदिन कामे सोपी होतील.
Edited By- Dhanashri Naik

