मित्राच्या मदतीला सचिन आला धावून
एका हाताने दिलेले दान दुसर्या हातालाही कळू नये हा नियम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच पाळत आला. त्यामुळे अपघातात अपंग होऊन रुग्णशय्येवर असलेल्या मित्राला मदत करुन त्याची कुणकूण कोणाला लागू दिली नाही. सचिनच्या मदतीमुळे मित्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि त्याच्या कुटुंबियांचे डोळेही पाणावले. क्रिकेट विश्वात सर्वोच्च स्थानी असलेल्या सचिनचे पाय नेहमी जमिनीवर राहिले. त्याने आपली सामाजिक जबाबदारीन कधी विसरली नाही. त्याच्याकडून वेळोवेळी होणार्या मदतीचा कुठलाही गाजावाजा त्याने कधी केला नाही. आता मास्टर ब्लास्टर सचिन अंडर 17 चा क्रिकेट संघातील मित्र दिलबीर सिंग याच्या मदतीसाठी धावून आला. त्याच्यावरील उपचाराचा सहा लाख रुपयांचा खर्चच त्याने उचलला नाही, तर त्याची विचारपूस करायला अहमदाबादमध्ये धाऊन आला. दिलबीरसिंग आणि सचिन 17वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत एकत्र खेळले होते. दिलबीरचा सन 2002 मध्ये भीषण अपघात झाला. यामुळे त्याचे कंबरेखालचे शरीर पांगळे झाले. तो रुग्णशय्येवर खिळून पडला. अपघातानंतर पहिले सहा महिने तो कोमात होता. त्याच्यावर ‘हिप रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया झाली तर त्याला उठ-बस शक्य होणार होती. परंतु दिलबीर हा खर्च उचलू शकत नव्हता. सचिनला त्याच्या परिस्थितीची माहिती मिळाली. सचिनने लागलीच उपचाराचा सर्व खर्च उचलला आणि त्याला भेटायलाही आला. सचिन घरी आल्यानंतरही दिलबीरसिंगच्या कुटुंबियांना विश्वास बसत नव्हता. सचिनचे आम्ही खूप खूप आभारी आहोत, असे दिलबीरचर बहिण सुखबीर हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले. दिलबीरची आई सुखदाय कौर मुलाला शस्त्रक्रियेनंतर नवेजीवन मिळणार असल्याने आनंदात आहे.