1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रिओ दी जानेरो , शुक्रवार, 19 ऑगस्ट 2016 (07:31 IST)

साक्षीला कुस्तीचे कांस्पदक

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचा पदकांचा दुष्काळ आज बाराव्या दिवशी संपला. फ्रीस्टाइल कुस्तीच्या 58 किलो वजनी गटात साक्षी मलिकने किर्गिझस्तानच्या आयसूलू टिनीबेकोव्हला धोबीपछाड टाकून 8-5 ने लढत जिंकली आणि भारताला रिओ ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकून दिले. ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत पदक पटकावणारी साक्षी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
 
साक्षी उपान्त्यपूर्व फेरीत रशियाच्या कोबलोव्हा व्हलेरियाकडून पराभूत झाली होती. मात्र, व्हलेरियाने अंतिम फेरीत प्रवेश केल्याने रिपेचेज लढतीत सहभागी होण्याची संधी साक्षीला मिळाली आणि याच संधीचे तिने सोने केले. कांस्यपदक पटकावण्यासाठी तिला दोन लढती जिंकायच्या होत्या. तिची पहिली लढत मंगोलियाच्या पुरेवदोर्जविरुद्ध झाली. अर्थात रशियाच्या व्हॅलेरिया कोब्लोवा हिच्याकडून पाचव्या लढतीत तिला पराभव पत्करावा लागला. पण, कोब्लोवा अंतिम फेरीत पोचल्यामुळे साक्षीला रेपीचेजच्या माध्यमातून ब्राँझपदकाची लढत खेळण्याची संधी मिळाली होती. 
 
पदकाच्या जवळ येऊन पुन्हा एकदा अपयशच पदरी पडणार अशीच भारतीयांची भावना त्या वेळी झाली. मात्र, दुसऱ्या फेरीत साक्षीने आपल्या दुहेरी पट काढण्याच्या हुकमी अस्त्राचा सुरेख वापर केला. एकापाठोपाठ दोन वेळा तिने याच डावातून प्रत्येकी दोन गुण मिळविले. त्यानंतर लढतीत तिनीबेकोव्हा बाहेर गेल्यामुळे साक्षीला एक गुण मिळाला. पिछाडीवरून ५-५ अशा बरोबरीमुळे रंगत पुन्हा वाढली. हातात केवळ त्या वेळी दहा सेकंद उरले असताना सर्वांचेच श्‍वास रोखले गेले. साक्षीने क्षणाचाही विलंब न घेता पुन्हा एकदा यशस्वी दुहेरी पट काढत दोन गुण घेतले. त्याच वेळी वेळ संपली. भारतीयांचा जल्लोष सुरू झाला. दुसरीकडे मात्र तिनीबेकोव्हाच्या प्रशिक्षकांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. अर्थात त्यांचे हे प्रयत्न फोल ठरले. तिसऱ्या पंचांनी निर्णय योग्य ठरवून साक्षीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.