रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 25 ऑगस्ट 2024 (10:52 IST)

भाग्यश्री जाधव: विषप्रयोगामुळे अकाली अपंगत्व ते पॅरिसमध्ये हाती तिरंगा, कहाणी जिद्दीची

Bhagyashree Jadhav
Bhagyashree Jadhav Facebook
"मला परिस्थितीपेक्षा लोकांनीच जास्त मारलं. आपल्याला हीनतेचा दर्जा मिळत असताना जेव्हा स्वाभिमान किंवा सन्मान काय असतो हे समजू लागतं, तेव्हा अन्नापेक्षाही सन्मान मोठा वाटतो."
 
जीवनाचा संघर्ष अशा शब्दांत मांडणारी महाराष्ट्राची महिला पॅराअ‍ॅथलिट भाग्यश्री जाधव पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत भारताची ध्वजवाहक असणार आहे.
 
पॅरिसमध्ये 28 ऑगस्टला सुरू होणाऱ्या पॅरालिंपिक स्पर्धेत भाग्यश्री भारताचा तिरंगा ध्वज हाती घेऊन देशाच्या क्रीडा पथकाचं नेतृत्व करणार आहे.
 
जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यावर विषप्रयोग झाला अन् त्यातून अकाली अपंगत्व आलं. पण त्यावरही जिद्दीनं मात करत भाग्यश्रीनं साता समुद्रापार देशाचं नाव उंचावणारी कामगिरी केली. त्यामुळं भाग्यश्री खऱ्या अर्थानं प्रेरणास्त्रोत आहे.
 
जीवनात टोकाच्या संघर्षाचा सामना केल्यानंतर अशा प्रकारचं यश मिळाल्याचा प्रचंड आनंद असल्याचं भाग्यश्रीनं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
पॅरालिंपिक स्पर्धेसाठी पॅरिसला रवाना होण्यापूर्वी भाग्यश्री जाधवशी बीबीसी मराठीनं संपर्क साधला. पण सराव आणि तयारी प्रचंड व्यस्त असल्याने ती जास्त वेळ देऊ शकली नाही.
 
त्यामुळं तिचे मानलेले भाऊ प्रकाश कांबळे यांच्याकडून तिच्या संघर्षाची कहाणी आम्ही जाणून घेतली.
 
प्रकाश कांबळे यांनी जीवनात पुन्हा उभं राहण्यासाठी आधार दिला. त्यामुळं त्यांना भाऊ मानत असल्याचं भाग्यश्रीनं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
काकांनी स्वीकारलं पालकत्व
भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातला. होनवडज हे भाग्यश्रीचं मूळ गाव.
 
दुष्काळाचा सामना करणाऱ्या माधवराव आणि पुष्पाबाई जाधव यांच्या शेतकरी कुटुंबात 24 मे 1985 रोजी भाग्यश्रीचा जन्म झाला.
 
वडील माधवराज जाधव मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळं भाग्यश्रीचे काका आनंदराव जाधव यांनी तिच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली.
जाधव कुटुंबामध्ये तीन पिढ्यांनंतर भाग्यश्रीच्या रुपानं मुलीचा जन्म झाला होता. त्यामुळं भाग्यश्री ही कायम सर्वांची लाडकी राहिली. पण पुढं तिच्या नशिबी मोठा संघर्ष होता.
 
होनवडजमधील शाळेमध्येच भाग्यश्री जाधव हिचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर पुढं 12 वीपर्यंत भाग्यश्रीनं शिक्षण घेतलं. पण लग्न झाल्यामुळं तिला फार शिकता आलं नाही.
 
विषप्रयोग आणि अपंगत्व
2004 मध्ये म्हणजे वयाच्या 19 व्या वर्षी भाग्यश्री याचं लग्नं झालं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही.
 
उलट लग्नानंतर भाग्यश्री यांच्या जीवनात अशी घटना घडली ज्यामुळं त्यांचं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. भाग्यश्री यांचे मानलेले भाऊ प्रकाश कांबळे यांनी या घटनेबाबत बीबीसी मराठीला माहिती दिली.
 
"भाग्यश्री हिच्यावर 2006 मध्ये विषप्रयोग झाला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर सुमारे दोन आठवडे ती कोमामध्ये होती. संपूर्ण कुटुंबालाच तेव्हा भाग्यश्री वाचू शकेल याची खात्री नव्हती," असं कांबळे सांगतात.
 
पण जीवन-मरणाच्या या संघर्षात भाग्यश्रीच्या जिद्दीनं विजय मिळवला. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं आणि भाग्यश्री शुद्धीवर आली.
पण मुलगी वाचल्याच्या आनंदावर पाणी फेरण्यासाठी जाधव कुटुंबासमोर दुसरं मोठं संकट उभं होतं. भाग्यश्रीला कंबरेखालच्या भागाला अपंगत्व आलं होतं. तिला स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्य नव्हतं.
 
ऐन तारुण्यात आलेल्या या संकटाचा सामना कसा करायचा या प्रश्नाचं उत्तर भाग्यश्री किंवा तिच्या कुटुंबातीलही दुसरं कुणाकडे नव्हतं.
 
या प्रकरणी भाग्यश्रीनं सासरच्यांविरोधात न्यायालयात धाव घेतली. पण त्यात कुणावरही आरोप सिद्ध झाले नाहीत. सध्या पोटगीच्या संदर्भातील त्यांचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
 
डॉ. शुभांगी पाटील या भाग्यश्रीच्या फिजिओथेरपिस्ट आहेत. त्या सध्या नांदेडमध्ये वैद्यकीय सेवा देतात. विशिष्ट नस दाबली गेल्यामुळं भाग्यश्रीला अकाली अपंगत्व आलं. विषप्रयोगामुळं अशा प्रकारची शारीरिक समस्या निर्माण होऊ शकते, असं डॉ. पाटील यांनी सांगितलं.
 
एकापाठोपाठ संकटांचा सामना
वयाच्या 21व्या वर्षी आलेल्या अपगंत्वामुळं भाग्यश्री प्रचंड धक्क्यामध्ये होती. पण त्यावेळी कुटुंबानं तिला साथ दिली. चालता येत नसल्यानं कुणीतरी भाग्यश्रीला पाठीवर किंवा हाताने उचलून घ्यायचं.
 
पण भाग्यश्री खंबीर होती. अशा शारीरिक समस्यांना ती घाबरली नाही. जीवनात पुढं जायचं आणि काहीतरी करायचं या विचारानं भाग्यश्रीनं अहमदपूरमध्ये पुढील शिक्षणासाठी डी.एड्. ला प्रवेश घेतला.
 
आई, भाऊ, काका-काकू यांच्या मदतीनं तिनं नवीन मार्ग निवडला. पण भाग्यश्रीच्या जीवनातील संकटं काही थांबण्याची नावं घेत नव्हती. पितृस्थानी असलेल्या काका आनंदराव जाधव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
भाग्यश्री पुन्हा खचली. तिला डीएडचं शिक्षण मध्येच सोडून द्यावं लागलं. पण तिनं पुन्हा मन घट्ट केलं आणि कुटुंबावर ओझं नको म्हणून गाव सोडलं. नांदेडच्या मुलींच्या वसतिगृहात राहून बी.ए.चं शिक्षण सुरू केलं.
 
हे सर्व सुरू असताना आरोग्याच्या आणखी एका संकटानं डोकं वर काढलं. भाग्यश्रीच्या नाकात एक गाठ तयार झाली होती. त्या गाठीमुळं भाग्यश्री यांना श्वासही घेता येत नव्हता.
ही गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती आणि त्यात जोखीमही होती. भाग्यश्रीनं धाडसानं याचाही सामना केला आणि मुंबईच्या जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करत तिला वाचवलं.
 
मदतनीसाच्या रुपात भेटला भाऊ
भाग्यश्रीला खासगी जीवनात जे काही भोगावं लागलं त्याबाबत न्याय मिळवण्यासाठी ती पोलीस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे उंबरे झिजवत होती. पण तिला कुणाकडूनही प्रतिसाद मिळत नव्हता.
तिला अनेकदा हीन वागणुकीचा सामनाही करावा लागला. कोणीही म्हणणं ऐकूण घेत नव्हतं तेव्हा त्यांना प्रकाश कांबळेंबद्दल माहिती मिळाली.
 
भाग्यश्रीनं प्रकाश कांबळे यांची भेट घेतली आणि त्यांना सर्वकाही सांगितलं. त्यावेळी प्रकाश कांबळे यांनी तिला मदत करायला सुरुवात केली आणि त्यातून काही प्रमाणात मार्ग निघू लागले.
दरम्यानच्या काळात मुक्त विद्यापीठातून बी.ए. करत असताना शिक्षणासह इतर खर्चासाठी भाग्यश्रीनं दारोदार साड्या विकण्याचं काम केलं. इतरही काही कामं केली. अगदी कष्टानं आणि स्वाभिमानानं ती जगत होती.
 
यादरम्यान प्रकाश कांबळे यांनी केलेल्या मदतीमुळं भाग्यश्रीला त्यांच्या रुपानं आणखी एक मोठा भाऊ मिळाला. तेव्हापासून भाग्यश्री त्यांना भाऊच म्हणते.
 
अशी सुरू झाली क्रीडा कारकीर्द
जगण्याचा संघर्ष सुरू असतानाच स्वतःच्या पायावर उभं राहायचं यासाठी भाग्यश्रीचे प्रयत्न सुरू होते. पायावर उपचार होणं शक्य आहे का? यासाठी त्यांनी वेगवेगळ्या डॉक्टरांच्या भेटीगाठी सुरू केल्या.
 
काही डॉक्टरांनी त्यांना व्यायाम करण्याचा, चालून पाहण्याचा सल्ला दिला. फिजिओथेरपी, अ‍ॅक्युपंक्चर असे अनेक मार्गांनी उपचारासाठी प्रयत्न सुरू होते.
 
प्रकाश कांबळे हे त्यावेळी होमगार्डचे पदाधिकारीही होते. त्यामुळे त्यांनी नांदेडमधील होमगार्डच्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रावर भाग्यश्रीच्या व्यायाम आणि चालण्याच्या सरावाची व्यवस्था करून दिली.
 
भाग्यश्रीची जिद्द पाहून सगळेच आवाक होते. सर्वांना त्याचं कौतुक होतं. त्यामुळं कांबळे यांच्या काही मित्रांनी तिला दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धांमध्ये उतरवण्याचा सल्ला दिला.
चौकशी केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांची माहिती मिळाली. त्यासाठी त्यांनी सराव सुरू केला. कोणत्या क्रीडा प्रकाराची निवड करायची यासाठी चर्चा झाली. त्यातून भालाफेक आणि गोळाफेक निवडून तसा सराव सुरू करायचं ठरलं.
 
पुण्यात 2017 ला महापौर चषक स्पर्धा होणार होत्या. त्यात सहभागी व्हायचं ठरवलं. पण सराव कसा करायचा. त्यासाठी एक व्हीलचेअर विकत घेतली. 2016 च्या अखेरीस त्यांनी सराव सुरू केला होता.
 
कांबळे यांनी होमगार्डमध्ये फिजिकल फिटनेसचा सराव घेणारे एक अधिकारी भाग्यश्रीच्या ट्रेनिंगसाठी डेप्युट केले. नांदेडच्या भाग्यनगरमधील होमगार्डच्या मैदानावर त्यांचं गोळाफेक आणि भालाफेकचं प्रशिक्षण झालं.
 
त्यातून जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर भाग्यश्रीने पुण्यातील महापौर चषक क्रीडा स्पर्धेत 2017 मध्ये गोळाफेक आणि भालाफेकमध्ये सुवर्णपदक आणि थाळीफेकमध्ये कांस्यपदक मिळवलं. तिथून खऱ्या अर्थानं तिच्या क्रीडा प्रवासाची सुरुवात झाली.
 
स्पर्धेसाठी गहाण ठेवले आईचे दागिने
पुण्यात सुवर्णपदक मिळवल्यानंतर या क्षेत्रात आणखी पुढं जाण्यासाठी भाग्यश्री वेगवेगळ्या स्पर्धांत सहभागी होऊ लागली. कोल्हापुरात 2018 मध्ये झालेल्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेतही तिनं गोळाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवलं.
 
कोणतेही तज्ज्ञ मार्गदर्शक, प्रशिक्षक कोच नसताना भाग्यश्रीनं ही कामगिरी करून दाखवली. 2018 मध्येच राष्ट्रीय स्तरावर चंदिगडच्या पंचकुलातील स्पर्धेत तिनं गोळाफेकमध्ये कास्यपदक मिळवलं.
 
पुढं तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा खुणावू लागल्या. त्यासाठी तिनं पुण्यात राहून सराव करण्याचा निर्णय घेतला. पण आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं नव्हतं.
 
चीनमध्ये होणाऱ्या 2019 पॅरा ओपन चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाली. पण आर्थिक अडचण होती. भाऊ, हितचिंतकांनी मदत केली. तरीही पुरेशी रक्कम जमा होत नव्हती.
 
अखेर आईचं मंगळसूत्र आणि दागिने गहाण ठेवून त्या पैशातून ती चीनला गेली. स्पर्धेत गोळाफेक आणि भालाफेक अशा दोन प्रकारांत कांस्यपदक मिळवत संघर्षाचं चीज तिनं करून दाखवलं.
यानंतर देशभरात भाग्यश्रीला ओळख मिळायला सुरुवात झाली. आता तिचं पुढं ध्येय होतं दिव्यांगांच्या आशियाई स्पर्धा आणि पॅरालिंपिक सारख्या मोठ्या स्पर्धा. पण पुन्हा सराव, डाएट आणि तयारीसाठीच्या खर्चाचा प्रश्न. त्यात कोरोना संकटामुळं पुणे सोडून भाग्यश्री पुन्हा नांदेडला पोहोचली. मात्र सराव सोडला नाही. साथीला कायम तिची आई होती.
 
सराव करण्यासाठी खुर्ची रोज घट्ट बसवावी लागायची. त्यासाठी भाग्यश्री यांच्या आई रोज घनाने (मोठा हतोडा) ठोकून ती खुर्ची बसवायच्या आणि रोज ती परत काढायच्या. फेकलेला गोळा उचलून पुन्हा आणून द्यायच्या, परत परत पुन्हा गोळा आणायचा हे त्याचं काम. पुष्पाबाई अगदी सावलीसारख्या मुलीबरोबर होत्या.
 
भाग्यश्रीला 2020 मध्ये हाताची दुखापत झाली. तेव्हा डॉक्टरांनी सराव थांबवायला सांगितलं. पण भाग्यश्रीनं माघार घेतली नाही. डॉक्टांच्या उपचारासह तिनं सराव सुरू ठेवला.
 
तिच्या फिजिओथेरपिस्ट डॉ. शुभांगी पाटील यांच्या मते, "भाग्यश्री खूप मेहनती आहे. ती जिद्दीनं कोणतंही काम पूर्ण करते."
 
अवघ्या सात वर्षांत पदकांची लयलूट
दुबईत 2021 च्या फाजाकप स्पर्धेसाठी तिची निवड झाली.त्यातही गोळाफेकमध्ये रौप्य आणि भालाफेकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
 
टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेतही भाग्यश्री सहभागी झाली होती. या स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारात ती सातव्या स्थानी राहिली होती.
 
चीनमधील 2023 च्या एशियन पॅरागेम्स (आशियाई स्पर्धा) मध्ये गोळाफेक क्रीडा प्रकारात तिनं रौप्य पदक मिळवलं.
 
त्यानंतर पॅरिसमध्ये जुलै 2023 मध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही ती गोळाफेक क्रीडा प्रकारात चौथ्या स्थानी होती. या कामगिरीच्या जोरावर तिनं पॅरिस ऑलिम्पिकमचं तिकिट मिळवलं.
 
याशिवायही अनेक स्पर्धांमध्ये भाग्यश्रीनं महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उंचावलं आहे. 2021-22 साठी महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्काराचीही ती मानकरी ठरली.
भाग्यश्रीनं 2016 च्या अखेरीस मैदानावर पाय ठेवला होता. अगदी काहीही माहिती नसताना शून्यापासून सुरुवात करत उण्या-पुऱ्या सात वर्षांमध्ये दुसऱ्यांदा पॅरालिंपिकच्या मंचावर पोहोचण्याची कामगिरी तिनं केली आहे. तीही वयाच्या चाळीशीच्या उंबऱ्यावर असताना.
 
आता पॅरिसमध्ये होऊ घातलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचा तिरंगा हाती घेऊन देशाच्या पथकाचं नेतृत्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.
 
जीवनात आजवर केलेल्या संघर्षाचं फळ मिळण्यासाठी भाग्यश्री पॅरिसमध्ये संपूर्ण शक्ती नक्कीच पणाला लावेल. पण स्पर्धेत व्हील चेअरवरून बसून तो गोळा हवेत भिरकावताना तिच्या हातात 140 कोटी भारतीयांचं बळ असेल यात शंका नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit