गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

गीता फोगटचे खरे कोच दंगलवर नाराज

मुंबई- आमीर खानच्या दंगल सिनेमात आपली व्यक्तीरेखा निगेटिव्ह दाखवल्याने पैलवान गीता फोगाटचे खरे प्रशिक्षक नाराज आहेत. सिनेमात आपली व्यक्तीरेखा खलनायकाची दाखवल्यामुळे प्रशिक्षक प्यारा राम सोंढी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहेत.
 
पण प्यारा राम त्याआधी त्यांच्या निकटवर्तीयांशी चर्चा करणार आहेत. सिनेमात दाखवलेल्या माझ्या व्यक्तिरेखेबाबत मी आधी आमिरशी बोलणार आहे. जर माझे समाधान झाले तर या प्रकरणी कायदेशीर कारवाई पण करणार. आमीरसारख्या मोठ्या कलाकराकडून ही अपेक्षा नव्हती, असेही ते म्हणाले.
 
लुधियानामध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना मी माझ्या तीन सहकार्‍यांसोबत सेटवर गेलो होतो. तिथे आमची भेट आमीर खान आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यासोबत झाली. पण त्यांनी सिनेमाच्या कोणत्याही सीनबाबत आमच्याशी बातचीत केली नाही. इतकचं नाही तर चित्रपटात काय दाखवणार हेदेखील माहित नव्हते. हा सिनेमा महावीर फोगाट यांच्या आयुष्यावर आधारित आहे, एवढचे मला माहित होते, असे प्यारा राम यांनी सांगितले.
 
प्रशिक्षक प्यारा राम सोंढी यांच्या मतेल महावीर फोगाट सज्जन व्यक्ती असल्याचे सगळ्यांनाच माहित आहे. त्यांनी कधीच आमच्या कामात हस्तक्षेप केला नाही. मुलींच्या सामन्यांवेळी ते अनेकवेळा नसायचेच.
 
दंगल पाहून आल्यानंतर माझ्या एका शिष्याने विचारले की, 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये तुम्हीच प्रशिक्षक होता ना? मी त्यावर हो बोललो. पुढे त्याने विचारले की, फायनलआधी तुम्ही गीताच्या वडिलांना खरच अंधार्‍या खोलीत डांबलं होते? ही माझ्यासाठी आश्चर्यकारक बाब होती, कारण असे कधीचं घडले नव्हते.
 
राष्ट्रीय पुरूष संघाचे प्रशिक्षक विनोद कुमार यांनीही प्यार राम सौंढी यांचे समर्थन केले आहे. नॅशनल कॅम्पदरम्यान गीताचे वडील पाटियालामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होते. पण त्यांनी कधीही प्रशिक्षकांच्या कामात हस्तक्षेप केला नाही. कॉमनवेल्थ गेम्सदरम्यान, सुरक्षा एवढी कडेकोट होती की, असे करणे शक्यच नाही, असे विनोद कुमार म्हणाले.