नदालचा दहाव्यांदा फ्रेन्च ओपनवर कब्जा
फ्रेन्च ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात विजय मिळवत राफेल नदारने 15व्या ग्रँडल्मॅवर आपले नाव कोरले आहे. शिवाय 10व्यांदा फ्रेन्च ओपन जिंकत इतिहास घडवला आहे.
नदालने वावरिंकाचा ६-२, ६-३, ६-१ ने सहज पराभव केला. एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी १० वेळा जेतेपद पटकावण्याची कामगिरी करणारा तो पहिला टेनिसपटू ठरला. कारकिर्दीतील २२ व्या ग्रॅण्डस्लॅम अंतिम फेरीत खेळत असलेल्या नदालने फ्रेंच ओपनमध्ये तिसऱ्यांदा सेट न गमावता जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने केवल ३५ गेम्स गमावले. त्यात अंतिम लढतीमध्ये गमावलेल्या सहा गेम्सचाही समावेश आहे. नदाल व वावरिंका यांच्यादरम्यान रंगलेल्या अंतिम लढतीत स्पेनच्या खेळाडूने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले आणि अखेरपर्यंत कायम राखले. १९६९ नंतर प्रथमच अंतिम फेरीत ३० वर्षांवरील खेळाडूंदरम्यान लढत झाली.
वावरिंकाला पहिल्या सेटच्या तिसऱ्या गेममध्ये ब्रेक पॉर्इंटची संधी मिळाली, पण त्यानंतर नदालने कुठलीच संधी न देता वर्चस्व गाजवले. वावरिंकाने सुरुवातीला नदालला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. त्याने चौथ्या गेममध्ये चार ब्रेक पॉर्इंट्सचा बचाव केला आणि २-२ अशी बरोबरी साधली. नदालने त्यानंतर सर्व्हिस कायम राखली आणि वावरिंकाची सर्व्हिस भेदत ४-२ अशी आघाडी घेतली. वावरिंकाने आपल्या सर्व्हिसवर फोरहँडचा फटका बाहेर मारताना १७ व्यांदा टाळण्याजोगी चूक करीत गुण गमावला. नदालने ४४ मिनिटांमध्ये पहिल्या सेटमध्ये सरशी साधली. नदालने दुसऱ्या सेटममध्ये शानदार सुरुवात केली. त्याच्या फोरहँडच्या फटक्यांपुढे वावरिंकाचा बचाव निष्प्रभ ठरला. वावरिंकाचा फोरहँडचा फटका नेटममध्ये गेल्यामुळे नदालने २-० अशी आघाडी घेतली. नदालने त्यानंतर सर्व्हिस कायम राखत दुसरा सेट सहज जिंकला. वावरिंकाला राग अनावर झाल्यामुळे त्याने आपली रॅकेट कोर्टवर आपटली. तिसऱ्या सेटच्या पहिल्या गेममध्ये नदालने पुन्हा एकदा २०१५ चा चॅम्पियन वावरिंकाची सर्व्हिस भेदली. त्यानंतर नदालने ४-१ अशी आघाडी घेतली. नदालने सर्व्हिस कायम राखत आघाडी वाढविली. वावरिंकाचा बॅकहँडचा फटका नेटवर गेल्यामुळे नदालचे विजेतेपद निश्चित झाले.
नदालचा बॅड पॅच संपला
तीन वर्षांपूर्वी नदालने विजेतेपद मिळवले होते. गेली 2 वर्षे तो विजयासाठी झगडत होता. मध्यंतरी तो दुखापतींनी ग्रासला होता. नदालच्या नावावर सध्या 15 ग्रँड स्लॅम विजेतेपदे असून फेडररचा 18 विजेतेपदांचा विश्वविक्रम मागे टाकण्यासाठी त्याला आणखी तीन विजेतेपदांची गरज आहे.