रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (17:22 IST)

सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला 'परम विशिष्ट सेवा पदक'

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारे सुभेदार नीरज चोप्रा यांना 'परम विशिष्ट सेवा पदक' देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. नीरज हे भारतीय लष्कराच्या राजपुताना रायफल्समध्ये तैनात आहेत. आतापर्यंत नीरजला अनेक सन्मान मिळाले आहेत. ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर अंतरावर भालाफेक करून पदक जिंकले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती राम नाथ कोविंद मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात 384 संरक्षण जवानांना शौर्य आणि इतर पुरस्कारांनी सन्मानित करतील. या पुरस्कारांमध्ये 12 शौर्य चक्र, 29 परम विशिष्ट सेवा पदके, 4 उत्तम युद्ध सेवा पदके, 53 अति विशिष्ट सेवा पदके, 13 युद्ध सेवा पदके यांचा समावेश आहे.
 
भारतीय लष्करातील 23 वर्षीय सुभेदार मूळचे हरियाणातील पानिपत येथील आहेत. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने 82.23 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर, 2017 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये, त्याने भालाफेकमध्ये 85.23 मीटर अंतरासाठी सुवर्णपदक जिंकले. नीरजने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 86.47 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी मार्च 2021 मध्ये त्याने 88.06 मीटरच्या नवीन राष्ट्रीय विक्रमासह आपल्या हंगामाची सुरुवात केली.
 
हा सन्मान कोणाला दिला जातो?
परम विशिष्ट सेवा पदक (PVSM) हा भारताचा लष्करी पुरस्कार आहे. शांतता आणि सेवेच्या क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संरक्षण कर्मचाऱ्यांना ते दिले जाते. प्रादेशिक सेना, सहाय्यक आणि राखीव दल, नर्सिंग अधिकारी आणि नर्सिंग सेवांचे इतर सदस्य आणि कायदेशीररित्या स्थापन केलेल्या सशस्त्र दलांसह भारतीय सशस्त्र दलातील सर्व श्रेणीतील कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र आहेत. परम विशिष्ट सेवा पदक 26 जानेवारी 1960 रोजी "विशिष्ट सेवा पदक, वर्ग I" म्हणून स्थापित केले गेले. 27 जानेवारी 1961 रोजी त्याचे नाव बदलण्यात आले.