शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (19:16 IST)

‘प्रज्ञानंदने पारंपरिक विचारपद्धतीला सुरुंग लावलाय, तो हारूनही भारत जिंकलाय’

pragyananda
प्रवीण ठिपसे, ग्रँडमास्टर
शब्दांकन - जान्हवी मुळे
Pragyananda
बुद्धिबळाचं सर्वांत महत्त्वाचं तत्व आहे. ‘मी चूक केली नाही, तर मला कुणी हरवू शकणार नाही. मी जोवर प्रतिस्पर्ध्यापेक्षा चांगलं खेळेन, तोवर मी जिंकण्याची शक्यता कायम राहील.’ भारताचा प्रज्ञानंद याच तत्त्वाला धरून खेळताना दिसतो.
 
यंदाच्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत प्रज्ञानंद भारताचा आणि अख्ख्या स्पर्धेचाच हीरो ठरला.
 
18 वर्षांच्या प्रज्ञानंदला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. पण तो ही फायनल गाठणारा सर्वांत तरूण बुद्धिबळपटू ठरला.
 
प्रज्ञानंदसाठीच नाही, तर भारतीय बुद्धिबळासाठीच ही स्पर्धा नवी चैतन्य आणणारी ठरली.
 
विश्वचषकातलं यश का महत्त्वाचं?
प्रज्ञानंदचं यश आणि मोठेपण समजून घेण्याआधी आपण ही विश्वचषक स्पर्धा का महत्त्वाची असते, ते पाहूया.
 
मुळात वर्ल्ड कप ही काही बुद्धिबळ जगज्जेतेपदाची स्पर्धा नाही. तर ही अशी स्पर्धा आहे जिथे जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवरून खेळून गेलेले, झोनल चॅम्पियन्स म्हणजे वेगवेगळ्या खंडांमधल्या स्पर्धा जिंकलेले साधारण दोनशे खेळाडू सहभागी होतात.
 
म्हणजे तुम्ही युवा खेळाडू असला किंवा रेटिंग तुलनेनं कमी असलं तरी तुम्ही या स्पर्धेपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही पहिल्या तिघांत आलात, तर पुढे जगज्जेत्याला आव्हान देण्यासाठी कँडिडेट्स स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते.
 
त्यामुळेच विश्वचषक स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे.
 
या स्पर्धेत बाद फेरी पद्धतीनं म्हणजे ड्रॉनुसार तुम्ही एक एक प्रतिस्पर्ध्याला हरवत पुढे जाता. नव्या फॉरमॅटनुसार प्रत्येक सामन्यात आधी दोन क्लासिकल म्हणजे पारंपरिक बुद्धिबळाचे डाव खेळले जातात.
 
त्यात बरोबरी झाल्यास दोन जलद डाव मध्यम टाईम कंट्रोल पद्धतीनं (दोन्ही खेळाडूंना 25 मिनिटं, प्रत्येक खेळीसाठी दहा सेकंद) आणि पुन्हा बरोबरी झाल्यास दहा मिनिटांचे आणखी दोन डाव खेळले जातात.
 
त्यातही निकाल लागला नाही, तर ब्लिट्झ प्रकारानं म्हणजे अतिशय झटपट बुद्धिबळाचे दोन डाव खेळले जातात. त्यानंतरही बरोबरी असेल तर तीन मिनिटांचा ब्लिट्झ डाव खेळला जातो.
 
म्हणजे बुद्धिबळाच्या या सर्व प्रकारांत तुम्ही पारंगत असाल, तर जिंकण्याची संधी जास्त असते.
 
उपांत्य फेरीत चार भारतीय
गेली अनेक वर्षं अनेक भारतीय या स्पर्धेत खेळले आहेत. कारण राष्ट्रीय विजेता आणि झोनल चॅम्पियन्सनाही या स्पर्धेत प्रवेश मिळतो.
 
पण यात आजवर केवळ विश्वनाथन आनंदच विजेतेपदापर्यंत पोहोचू शकला होता.
 
इतर बहुतांश भारतीय खेळाडू आठ फेऱ्यांच्या या स्पर्धेत पहिल्या-दुसऱ्या फेरीपलीकडे जाऊ शकत नव्हते.
 
क्वचितच काही खेळाडू तिसऱ्या पोहोचू शकले होते. एखाद दुसऱ्या वेळेला भारतीय खेळाडू चौथ्या फेरीपर्यंत पोहोचू शकले होतो.
 
यावेळी मात्र अचानक खूपच वेगळा बदल झाल्याचं दिसतं. यावर्षी उपांत्यपूर्व फेरीत चार भारतीय होते-
 
म्हणजे अंतिम आठ खेळाडूंपैकी निम्मे एका देशाचे होते. त्यात चीनचा, रशियाचा किंवा पोलंड आणि इंग्लंड एकही खेळाडू नव्हता तर अमेरिकेचा एकच खेळाडू होता.
 
त्यामुळे ही स्पर्धा लक्षणीय ठरली. त्याला कारण ठरलं ते भारताच्या तरूण बुद्धिबळपटूंचं खेळातलं प्रावीण्य.
 
वयाच्या विशीतल्या आणि वीसच्या आतल्या या खेळाडूंना या स्पर्धेत आपल्या खेळाचं प्रदर्शन करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी बिल्कुल नाउमेद केलं नाही.
 
प्रज्ञानंदनं फायनल गाठत ही स्पर्धा गाजवलीच पण इतरांनीही उत्तम कामगिरी बजावली.
 
ग्रँडमास्टर गुकेश कार्लसन विरोधात पराभूत झाला, तोवर सगळ्या मॅचेस जिंकला होता. विदित गुजराथीनं पाचव्या फेरीत रशियाच्या निपोम्नियाचीला हरवलं जो जागतिक क्रमवारीत पाचवा आहे. अर्जुन एरिगैसीही अंतिम आठमध्ये आला.
 
भारताच्या युवा खेळाडूंनी हे कसं साध्य केलं?
 
भारताच्या यशामागची कारणं
भारतीय बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप मोठी सुदैवाची घटना म्हणजे 2022 साली बुद्धिबळ ऑलिंपियाडचं आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आलं.
 
2014 साली आपल्याला या स्पर्धेत मेडल मिळालं होतं, पण बहुतेकदा पदक मिळण्याची शक्यता कमी असायची.
 
याचं एक कारण म्हणजे भारतात एरवी संघ निवडताना फक्त आंतरराष्ट्रीय क्रमवारीचा, इलो रेटिंगचा आधार घेतला जातो. त्यामुळे दर ऑलिंपियाडला केवळ रेटिंगमध्ये आघाडीवर असलेल्या खेळाडूंना संधी मिळायची. त्यावेळी चांगलं खेळत असलेले खेळाडू मागे राहायचे.
 
मग असं दिसायचं की आपले सर्वोत्कृष्ट खेळाडूही जिंकू शकत नाहीत, तर आपल्या खेळाचा दर्जा कुठेतरी खाली आहे.
 
पण 2022 साली यजमानपद आपल्याकडे होतं. तुम्ही यजमान असता, तेव्हा तुम्हाला एक किंवा दोन संघ अधिक खेळवायची संधी मिळते. अन्य देश केवळ एकच संघ पाठवू शकतात.
 
भारतालाही तीन संघ खेळवण्याची संधी मिळाली.
 
निवडसमितीला पटो वा न पटो, पण कार्लसननं तेव्हा म्हटलं होतं की भारताचा ज्युनियर खेळाडूंचा इंडिया-2 हा संघ, पहिल्या मुख्य संघापेक्षा जास्त चांगला खेळतो आहे. याचं त्यावेळी सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. पण झालंही तसंच.
 
अकरावं मानांकन असलेल्या इंडिया-2 संघानं कांस्यपदक मिळवलं तर दुसरं मानांकन असलेला इंडिया-1 संघ मात्र चौथा आला.
 
त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या स्पर्धेत ग्रँडमास्टर गुकेशनं पहिल्या पटावर सुवर्णपदक मिळवलं, तर कार्लसनला ब्राँझ पदकावर समाधान मानावं लागलं.
 
दुसऱ्या बोर्डवर निहाल सरीननं गोल्ड मेडल मिळवलं तर तिसऱ्या बोर्डवर अर्जुन एरिगसीनं रौप्य आणि प्रज्ञानंदनं कांस्य मिळवलं.
 
म्हणजे टॉप तीन बोर्ड्सवर एवढी चार पदकं मिळवणारा भारत एकच देश होता.
 
त्यामुळे केवळ रेटिंगच्या आधारे संघ निवडून चालणार नाही आणि खेळाडूंची त्यावेळेची ताकद काय आहे यावर खूप गोष्टी अवलंबून असतात हे सिद्‌ध झालं.
 
जूनमध्ये दुबईत ग्लोबल चेस लीग झाली, ज्यात लहान आणि तरुण खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळीही प्रज्ञानंदनं बघता बघता त्याच्यापेक्षाही चांगलं रेटिंग असलेल्या मोठ मोठ्या खेळाडूंना हरवलं होतं. त्याच्यादृष्टीनं ही स्पर्धा खूप महत्त्वाची ठरली.
 
ऑलिंपियाड आणि ग्लोबल चेस लीगनं साधलेला परिणाम खूप महत्त्वाचा होता, असं मला वाटतं. एवढे सगळे मोठे दादा खेळाडू आहेत, त्यांच्यासमोर आपला निभाव कसा लागणार अशी मानसिकता या खेळाडूंची राहिली नाही.
 
आपण खराब खेळलो नाही, तर त्यांना सहज हरवू शकतो, असा आत्मविश्वास युवा खेळाडूंमध्ये निर्माण झाला. त्याचीच परिणती वर्ल्ड कपमधल्या कामगिरीत झालेली दिसते.
 
प्रज्ञानंदनं असं मिळवलं यश
अठरा वर्षांच्या प्रज्ञानंदचं रेटिंग कमी असल्यामुळे त्याला सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आपल्यापेक्षा जास्त ताकदवान खेळाडूंचा सामना करावा लागला. ही गोष्ट त्याच्यासाठी खरं म्हणजे खूप कठीण होती.
 
चौथ्या फेरीत त्याच्यासमोर होता अमेरिकेचा हिकारु नाकामुरा. नाकामुरा हे झटपट बुद्धिबळातलं मोठं नाव. ‘मी ब्लिट्झ चेसमध्ये जगात सर्वोत्तम आहे’ असं म्हणण्यास नाकामुरा धजावतो आणि तो ब्लिट्झ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकदा कार्लसनच्याही पुढे आला होता.
 
प्रज्ञानंद आणि नाकामुरामधले पहिले दोन डाव ड्रॉ झाल्यावर हिकारूला आत्मविश्वास वाढला असावा की या रॅपिड खेळात तर माझ्यासारखं कुणीच नाही. पण बघता बघता सगळे गेम्स ड्रॉ होऊ लागले. जेव्हा तीन मिनिटांच्या टायब्रेकरची वेळ आली, तेव्हा अचानक प्रज्ञानंदनं त्याचा पराभव केला.
 
नाकामुरासारखा बलाढ्य खेळाडू, जो अतिजलद बुद्धिबळातला फार मोठा चॅम्पियन समजला जातो, त्याचा पराभव प्रज्ञानंदनं केला.
 
पुढे उपांत्यपू्र्व फेरीत प्रज्ञानंदला भारताच्याच अर्जुन एरिगासीसोबत खेळावं लागलं. पण रँकिंगमध्ये पुढे असलेल्या एरिगासीला प्रज्ञानंदनं तीन मिनिटांच्या ब्लिट्झ फेरीत हरवलं. फारच सुंदर आणि कल्पकतेनं तो खेळला.
 
बऱ्याचदा असं वाटलं की आता प्रज्ञानंद हरतो की काय. पण प्रतिस्पर्ध्याला एखादी चांगली मूव्ह सुचली नाही तर आपण त्यातून कसं पुढे जायचं, सावरायचं हे त्याला नेमकं ठाऊक आहे.
 
उपांत्य फेरीतही प्रज्ञानंदनं अमेरिकेच्या फॅबियानो करुआनाला हरवलं जो सध्याचा वर्ल्ड नंबर तीन आहे. पण त्याचं रेटिंग किंवा दबदबा पाहून प्रज्ञानंद कुठेही बावरून गेला नाही.
 
बुद्धिबळात एक महत्त्वाचं वाक्य आम्ही नेहमी सांगतो की, विजय नेहमी चांगल्या परिस्थितीमुळे मिळू शकत नाही तर विजय चांगल्या चालींमुळे मिळतो. करुआनाला चांगली परिस्थिती मिळाली, पण त्याला चांगल्या चाली सुचल्या नाहीत आणि प्रज्ञानंदला परिस्थिती विपरीत असतानाही चांगल्या चाली सुचल्या.
 
प्रज्ञानंदचीची कल्पनाशक्ती, युक्ती, पुनरागमन करण्याची क्षमता किती मोठी आहे हे या स्पर्धेत दिसून आलं.
 
तो बाद होणारा खेळाडू नाही. त्याला तुम्ही हरवलंत तर पुढच्या डावात तो पुन्हा मुसंडी मारतो, सी-सॉ करतो आणि तुमच्याच अंगावर येऊन आदळतो. म्हणूनच तो यशस्वी ठरतो.
 
पण विश्वचषकापेक्षाही प्रज्ञानंद पुढच्या वर्षीच्या कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे, ही मोठी गोष्ट आहे.
 
प्रज्ञानंदच्या खेळात गेल्या वर्ष-दीड वर्षात मोठी सुधारणा झाली आहे. मला वाटतं त्याचं मुख्य कारण ऑलिंपियाड आणि ग्लोबल चेस लीगमध्ये त्याला मिळालेली संधी हे आहे.
 
आजही फक्त रेटिंगचा विचार केला, तर प्रज्ञानंद भारताच्या A टीममध्ये येऊ शकत नाही, कारण त्याचं एलो रेटिंग 2690 एवढंच आहे. त्याच्यापेक्षा अधिक रेटिंग असलेले पाच खेळाडू भारताकडे आहेत.
 
पण त्याचा आता भारतीय टीममध्ये समावेश झाला नाही तर तो वेडेपणा ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे रेटिंग हाच निकष ठेवण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीला प्रज्ञानंदनं सुरुंग लावला आहे, असं म्हणता यईल.
 
रेटिंगपेक्षा खेळातलं सातत्य आणि खेळाडूमध्ये महिन्यागणिक किती सुधारणा झाली आहे, खेळाडू किती कल्पक आहे आणि त्याची किंवा तिची वाईट स्थितीतून पुनरागमन करण्याची क्षमता कशी आहे याकडे लक्ष न देता मत बनवणं थांबवायला हवं.
 
पुढच्या वर्षी कँडिडेट्स स्पर्धेत प्रज्ञानंद खेळणार आहे. खेळाडूंची वाटचाल पाहता त्यांनी सातत्य तर 2026 मध्ये कँडिडेट्समध्ये आपले दोन किंवा तीन खेळाडू असतील. आणि 2026 किंवा 2028 मध्ये भारतीय जगज्जेता असण्याची शक्यता मला खूपच जास्त वाटते.
 
आजमितीला मला वाटतं की प्रज्ञानंद आणि गुकेश या दोघांपैकी एक किंवा दोघं ही कामगिरी बजावू शकतात. कारण गुकेश 17 वर्षांचा आणि प्रज्ञानंद 18 वर्षांचा आहे आणि दोघांची प्रतिभा सध्या इतरांपेक्षा जास्त दिसते आहे.